युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करण्यावर भर देण्यात आला.
अनिल ठाणेकर
ठाणे : युवासेना कोर कमिटीची महत्वपूर्ण बैठक ठाणे येथील आनंद आश्रमात पार पडली. शिवसेनेचे पक्षनेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या भविष्यातील धोरणावर मंथन करण्यात आले. या बैठकीत युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीत युवासेनेतील कोर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. युवासेनेची आगामी दिशा आणि भूमिका ठरविण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. युवासेनेसाठी महत्वाचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले. संघटनात्मक पुनर्रचना, युवकांचा सहभाग, महिलांचे सबलीकरण आणि पक्षाच्या भविष्यातील धोरणांवर विशेष भर देण्यात आला. महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये युवासेनाचा विस्तार, राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन, समुदायीक संपर्क मोहिम राबविणे तसेच सामाजिक व पर्यावरणीय विकासासाठी विशेष प्रयत्न या ठरावांमध्ये प्रामुख्याने समाविष्ट होते.विशेषत: दुर्बल घटकांतील मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देणाऱ्या युवासेना शैक्षणिक मदत कक्ष उपक्रमावर आणि शासकीय विभागांशी समन्वय साधण्यासाठी युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करण्यावर भर देण्यात आला.हे सर्व ठराव शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. महाराष्ट्राला प्रगतीशील व सर्वसमावेशक राज्य बनवणे हा त्या मागील उद्देश आहे. या दृष्टीने सर्व युवा सैनिकांनी जोमाने कामाला लागावे व प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
००००