स्वाती घोसाळकर
मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील महत्वाच्या बैठकी रद्द करून दोन दिवस दरे गावी गेल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. दोन दिवस शिंदे यांनी आपला सर्व संपर्क तोडला होता. इतकेच काय त्यांच्या मंत्रिमंडळातील दिपक केसरकर यांना तर दरेतील गेटवरूनच परत जावे लागले होते. पण आज अखेर दरेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात परतले. एकनाथ शिंदे इन अक्शन असून मंत्रिमंडळातील वाटाघाटींना पुन्हा जोरकसपणे सुरूवात झाली आहे.
आज ठाणे येथील रेमंड हेलिपॅडवरच एकनाथ शिंदे यांनी दिपक केसरकर यांच्यासमवेत उभ्यउभ्या महत्वपुर्ण चर्चा केली. निरोपांचे आदानप्रदान झाले आणि तेथून केसरकर हे मुंबईला तर एकनाथ शिंदे हे ठाण्याला रवाना झाले. थोडक्यात ठाण्यात पावूल ठेवताच एकनाथ शिंदे यांनी कामास सुरुवात केली.
दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भाजपला गेल्यामुळे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या सर्व चर्चांवर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले असून, भाजपच्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार शिंदेंनी केला.
एकनाथ शिंदेंनी आज मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, ‘मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या होत्या. आम्हाला जनतेने यश प्रचंड मिळवून दिले. मी मागच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट केली होती. नरेंद्र मोदी आणि अमित शाहा मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील, त्याला माझा आणि शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल. आमच्या मनात किंतु-परंतु नाही आणि इतर कुणाच्याही मनात नसावा,’ अशी स्पष्टोक्ती शिंदेंनी दिली.
श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्याची चर्चा सुरू आहे, हे खरंय का? या प्रश्नांना उत्तर देताना शिंदे म्हणाले, ‘चर्चा सुरू आहेत आणि या चर्चेतून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. आम्हाला लोकांनी निवडून दिले आहे, लोकांना जी आश्वासने आम्ही दिली आहेत, ती आम्हाला पूर्ण करायची आहेत. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने लोकांशी आम्ही बांधील आहोत आणि ती बांधीलकी जपायची आहे. मला काय मिळाले, कोणाला काय मिळाले, यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे, हे महत्वाचे आहे. जनतेले आम्हाला भरभरुन दिले आहे, आमच्यावर मतांचा वर्षाव केला आहे, आता आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत.’
‘आम्ही एक बैठक अमित शाहांसोबत झाली होती, आता आमची तिघांची बैठक होईल आणि यातून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. राज्याने आम्हाला खूप दिले आहे, राज्यात लवकर चांगले सरकार स्थापन व्हावे, अशी जनतेची इच्छा आहे. लोक काय बोलतात, विरोधक काय बोलतात, ह्याच्याशी आम्हाला घेणं-देणं नाही. महायुतीत कुठलाही समन्वयाचा अभाव नाही. मला माझी भूमिका परत परत मांडण्याची गरज नाही. मी यापूर्वीच सांगितले की, भाजप जो निर्णय घेईल, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल,’ असेही शिंदेंनी यावेळी सांगितले.