मुंबई : मागील सत्तासंघर्षात सर्वाधिक १०५ जागा जिंकूनही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याएवेजी एनवेळी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा धक्कादायक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून घेण्यात आला होता. आता भाजपाने राज्यात इतिहासातील विक्रमी कामगिरी करत सर्वांधिक १३२ जागा जिंकल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत. एनवेळी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी संघ दक्ष झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच हवेत असा स्पष्ट निरोप संघाकडून भाजपा श्रेष्ठींना पाठविण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
नवीन मुख्यमंत्रिपदाच्या निवडीबाबत भारतीय जनता पक्षांतर्गत सुरू असलेल्या चर्चा आणि जातीय समीकरणांच्या आधारे निर्णय घेण्याची शक्यता यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
आरएसएसने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद देण्याबाबत चर्चा केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला दणदणीत विजय मिळवून दिला.आरएसएसने त्यांना पसंती दिली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत भाजपच्या एका गटाने मुख्यमंत्रिपदासाठी अन्य दावेदारांची नावे पुढे केली आहेत.
राजकीय वर्तुळात विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नावे चर्चेत आहेत. विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, मोहोळ हे मराठा समाजातील नेते आहेत. बावनकुळे हे ओबीसी प्रवर्गातील आहेत. त्यांच्या संभाव्य नावांमुळे जातीय समीकरणे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. विधानसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली. मुख्यमंत्रिपदाच्या निवडीत ही बाब लक्षात घ्यायला हवी, असे या नेत्यांच्या समर्थकांचे मत आहे.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीबाबत सुरू असलेल्या गोंधळामुळे संघ परिवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीदरम्यान आरएसएसने देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ जोरदार प्रचार केला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ३००० स्वयंसेवकांसह मोहीम राबवून महायुतीचा भव्य विजय निश्चित करण्यात आला.
संघानि भाजप नेतृत्वाला स्पष्ट संदेश दिला आहे की, फडणवीस यांची निर्णायक भूमिका लक्षात घेऊन त्यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड करावी. तसे न केल्यास आगामी निवडणुकीत, विशेषतः बीएमसी निवडणुकीत पक्षाचे मोठे नुकसान होऊ शकते, असंही संघाने सांगितल्याचे बोलले जात आहे. नेते संघाचे मार्गदर्शनाचे पालन करत नाहीत यामुळे संघ नाराज असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही मराठा समाजातील असल्याचे संघाचे म्हणणे आहे. अशा स्थितीत भाजपच्या काही नेत्यांनी मराठा मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरण्याला कोणतेही कारण नाही, असंही संघाचे मतआहे.