जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या
ठाणे : जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या वतीने जागतिक एड्स दिन-२०२४ जनजागृतीपर प्रभात फेरी व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या रॅलीस आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन आंबाडेकर, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी जनजागृतीपर प्रभात फेरीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार, ठाणे महानगरपालिकेच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. चेतना मिथील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आशा मुजांळ, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रतन गाढवे, जिल्हा पर्यवेक्षक अशोक देशमुख, जिल्हा पर्यवेक्षक निलीमा पाटील, सत्वा टीम आणि वायआरजी टीम उपस्थित होते.
जागतिक एड्स दिन २०२४ ची थिम टेक द राईट् पाथ ही आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून आज जनजागृती रॅली काढण्यात आली. ही जनजागृतीपर प्रभात फेरी जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथून रहेजा गार्डन पोलीस स्टेशन मार्गे तीन हात नाका सर्विस रोड मार्गे स्वर्गीय दादा कोंडक अम्पिथीटर, ठाणे येथे विसर्जित करण्यात आली. प्रभात फेरी, बा. ना बांदोडकर कॉलेज, ठाणे, एन. के.टी कॉलेज ठाणे, ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे, आर. जे. ठाकूर कॉलेज, परिचारीका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, ठाणे, कळसेकर कॉलेज, मुंब्रा, ज्ञानगंगा महाविद्यालय, कासारवडवली, सहयोग कॉलेज, ठाणे, जोशी बेडेकर कॉलेज, ठाणे, जेव्हीएम मेहता कॉलेज, ऐरोली, केबीपी कॉलेज, वाशी , तेरणा इंजिनियरीग कॉलेज, एसपीडी कॉलेज, ठाणे यांच्यासह विविध सामजिक संस्था व एचआयव्ही-एड्स क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी असे अंदाजे ६०० ते ७०० जण सहभागी झाले होते. एडस् निर्मूलनात काम करणाऱ्या संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. ही रॅली जिल्हा रुग्णालयापासून प्रमुख रस्यांवरुन काढण्यात आली. या रॅलीत जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. याप्रसंगी ठाणे येथील आदिती असर ग्रुपमार्फत एच. आय. व्ही/एड्स विषयी “जनजागृतीपर पथनाटय” सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
याप्रसंगी डॉ. नितीन आंबाडेकर यांनी, एचआयव्ही पॉझिटीव्हचे प्रमाण जरी कमी झाले असले तरी बेसावध न राहता एचआयव्हीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अजूनही एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन केले.
उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी, युवा शक्तीच्या माध्यमातून सध्याची व भावी पिढी एचआयव्ही मुक्त करण्यासाठी सर्वानी मिळून युवकांना एचआयव्ही विषयी जागरुकता आणण्यासाठी सोशल मिडीया व व्याख्यानांच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी उपस्थितांना एच. आय. व्ही. एड्स कशामुळे होतो, त्यामागील प्रमुख चार कारणांची माहिती दिली. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एचआयव्ही निर्मूलन करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यातील मोफत औषधोपचार व चाचणी करणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या आयसीटीसी, एआरटी, सुरक्षा केंद्र, क्षयरोग विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी नागरी आरोग्य केंद्र, हस्तक्षेप प्रकल्प गट, रक्तपेढी यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
