शिंदे ठाण्यात, अजित पवार दिल्लीत
स्वाती घोसाळकर
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेत एतिहासिक विजय मिळवून १० दिवस उलटल्यानंतरही महायुती अजूनही सत्ता स्थापन करू शकलेले नाही. आधी मुख्यमंत्रीपदावरून आणि आता गृह खात्यावरून महायुतीत कलह सुरु आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आधी मुख्यमंत्रीपदावरील दावा सांगत होते. त्यावर भाजपाची दमछाक केल्यानंतर अखेर शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला खरा पण मुख्यमंत्रीपद नसेल तर किमानपक्षी गृहखाते हवेच अशी आग्रही भूमिका मांडल्याने चर्चा पुढे सरकू शकली नाही. दोन दिवसापुर्वी शिंदे रागावून दिल्लीहून थेट दरे या त्यांच्या गावी गेले होते. मुंबईत परतल्यानंतरही त्यांनी भेटीगाठी टाळल्या. आणि सोमवारी तर सर्व भेटी रद्द करीत ठाण्यात राहणे पसंद केले. सोमवारी दुसऱ्या टप्यातील अमित शाहसोबतची दिल्लीत बैठक होती. आणि त्यासाठी शिंदे दिल्लीत अपेक्षित होते. पण अजित पवार दिल्लीत दाखल झाले तरी शिंदे मात्र ठाण्यातच होते. संध्याकाळी उशीरा भाजपाचे संकट मोचक गिरीश महाजन ठाण्यात शिंदेंची भेट घेण्यास पोहचले होते.
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस मुंबईत असूनही शिंदे आणि त्यांची भेट झालेली नाही. त्यामुळे या दोघातील अबोला हा २०१९ ची फडणवीस आणि उद्धव ठाकरेंतील अबोल्याची आठवण करून देणारा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
दरम्यान, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची जोरदार तयारी सुरू असून शपथविधीच्य कार्यक्रमासाठीही तयारी सुरू झालीय. या तयारीचा आढावा भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि आमदार प्रसाद लाड यांनी आझाद मैदानावर जाऊन घेतला. येत्या ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान येथे हा सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, ही तयारी पाहण्याकरता आम्हाला बोलावलं असतं तर आम्हीही आलो असतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षाचे आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
“ही तयारी सरकारी यंत्रणेतर्फे केली जाते. ज्या पक्षाचं सरकार आलंय, त्या पक्षाचे लोक जाऊन तयारीची पाहणी करतात, जेणेकरून काही कमतरता राहू नये. शेवटी हा कार्यक्रम पक्षाचा असतो. त्यांनी पाहणी केली आणि आम्ही केली हे सारखंच आहे. पाहणी केली याचा आनंद आहे. भाजपा आमचा सर्वांत मोठा पक्ष आहे. तो आमचा मोठा भाऊ आहे”, असंही दीपक केसरकर म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या सर्व बैठका रद्द
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी रविवारी परतले असले तरी, त्यांची प्रकृती पुर्णपणे बरी झालेली नाही. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारी निवासस्थानीच विश्रांती घेतली असून यामुळे त्यांच्या सर्वच बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.
राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असले तरी आठ दिवस उलटूनही मुख्यमंत्री ठरू शकलेला नाही. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली असून शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. एकीकडे राज्यातील सरकार स्थापनेवरून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असतानाच, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे.
शिंदेंच्या गोटात सन्नाटा, मंत्रीपदासाठी आमदार बेचैन
एकनाथ शिंदे एन मोक्याच्या क्षणी आजारीपडल्यामुळे शिवसेनेच्या आमदारात कमालीची बेचैनी आहे. मंत्रीपदासाठी ना फोन ना चर्चा असल्यामुळे मंत्रपदासाठी इच्छुक आमदारांची धाकधुक वाढली आहे. भाजपावर दबाव टाकून काहीही पदरात पडणार नाही उलट सामंज्यसाने त्यांच्याशी वाटाघाटी करण्यातच हुशारी असल्याचे नेत्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर प्रतिक्रीया दिली. याउलट अजित पवार हे शिंदेंच्या नाराजीचा पुरेपूर फायदा उठवित मोक्याची मंत्रीपदे पदरात पाडून घेतील अशी भीतीही या नेत्याने वर्तवली.
मुख्यमंत्र्याची घोषणा बुधवारी
शैलेश तवटे
मुंबई : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी असल्यामुळे त्यांनी सर्व बैठका रद्द केल्या असतानाच भाजपा मात्र दुप्पट वेगाने नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तयारी करत असून येत्या बुधवारी भाजपा गटनेत्याची निवड करून मुख्यमंत्रीपदाचे नावही घोषित करेल. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाची घोषणा करणे ही फक्त आता औपचारिकता असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. बुधवारच्या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची नेमणूक भाजपातर्फे करण्यात आली आहे. बुधवारी नवनिर्वाचित आमदारांशी बोलून त्याबाबतचा अहवाल दिल्लीत वरीष्ठांना देतील आणि दिल्लीतून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल असे सांगण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीतच पवार यांच्याशी चर्चा करून भाजपाने परस्पर शपथविधी समारंभ ५ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्याची घोषणा केली. पण अजून महायुतीतील तीनही पक्षांना किती मंत्रीपदे मिळावीत, खातेवाटप कसे असावे आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याकडून मंत्रीपदांसाठी कोणाची निवड केली जाणार, या बाबींवर शिंदे, फडणवीस व पवार यांच्यात सोमवारपासून चर्चा सुरू होणार होती. परंतु, एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी सर्व बैठका रद्द केल्या.
शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील चर्चेतून मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपावरून तोडगा निघाला नाही तर पुन्हा दिल्लीत चर्चेची आणखी एक फेरी होऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.
राज्यात पुढचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलंय. मात्र, महायुतीतील अंतर्गत वादामुळे हे नाव जाहीर करण्यास उशीर केला जातोय. सत्ता स्थापनेत माझा कोणताही अडसर नसेल अशी भूमिका मांडलेल्या एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व बैठका रद्द केल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाची चर्चा रखडली आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपद निश्चित करण्याकरता भाजपाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपाने निरिक्षकांची नावे जाहीर केली आहेत.
शपथविधीसाठी महातयारी !
सिध्देश शिगवण
मुंबई : महायुतीच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून येत्या 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. आणि म्हणूनच या महायुतीच्या या शपथविधीसोहळ्यासाठी महातयारी करण्यात येत आहे.
या शपथविधी सोहळ्यासाठी साधारणतः 30 ते 40 हजार लोक अपेक्षित आहेत. त्या अनुषंगाने आझाद मैदानात एकुण 3 स्टेज असणार आहे.
मुख्य स्टेज हा ६० बाय १०० बाय ८ फुट उंच असणार आहे. या मंचावर पंतप्रधान आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री असतील. तर उजव्या बाजूला ८० बाय ५० बाय ७ फुट उंच मंच असेल. यावर सर्व साधू संत बसतील. तर डाव्या बाजूला ८० बाय ५० बाय ७ फुट उंचीचा एक स्टेज असेल. या मंचावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असतील आणि साऊंड सिस्टीम या ठिकाणी असणार आहे. मुख्य मंचाच्या उजव्या बाजूला खासदार आणि आमदार यांची बसण्याची व्यवस्था केली आहा. त्यासाठी 400 खुर्च्या असणार आहे. बाजूला आणि मुख्य मंचाच्या समोर व्हीआयपी गेस्टची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास १००० खुर्च्या या ठिकाणी असणार आहेत.
डाव्या बाजूला महायुतीमधील मुख्य पदाधिकारी यांच्यासाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. तर कार्यकर्त्यांसाठी सात विभागात बसण्याची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. संपुर्ण मंचाचा बाजूला ६ बाय १६ उंचीचे कटआउट लावले जातील. कार्यकर्त्यांसाठी एकुण तीन प्रवेशद्वार असणार आहे. मुंबई महापालिका समोर हे प्रवेशद्वार असणार आहे. व्हीआयपी यांच्यासाठी एकुण तीन प्रवेशद्वार असतील. फॅशन स्ट्रीट कडून व्हीआयपीनी प्रवेश दिला जाईल.