मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) घर खरेदीदारांच्या विविध तक्रारींच्या निवारणासाठी 200.23 कोटी रुपये वसूल केले आहेत. मुंबई शहर, उपनगर, पुणे, ठाणे, नागपूर, रायगड, पालघर, संभाजीनगर, नाशिक आणि चंद्रपूर यांसह विविध जिल्ह्यांमध्ये ही रक्कम वसूल करण्यात आली आहे.
यामध्ये मुंबई उपनगर (76.33 कोटी रुपये) आणि पुणे (39.10 कोटी रुपये) हे जिल्हे आघाडीवर आहेत. याशिवाय, ठाणे (11.65 कोटी रुपये), नागपूर (9.65 कोटी रुपये), रायगड (7.49 कोटी रुपये), पालघर (4.49 कोटी रुपये), संभाजीनगर (3.84 कोटी रुपये), नाशिक (1.12 कोटी रुपये), आणि चंद्रपूर (9 लाख रुपये) यांचाही समावेश आहे.
नुकसान भरपाईच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी महारेराने मुंबई उपनगर आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सेवानिवृत्त तहसीलदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अधिकारी प्रलंबित तक्रारींच्या वसुलीस गती देतील.
महारेराने आतापर्यंत 442 प्रकल्पांमध्ये 705.62 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी 1163 वारंटस जारी केले आहेत. त्यापैकी 139 प्रकल्पांतून 200.23 कोटी रुपयांची वसुली झाली आहे.
महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी सांगितले की, “घरखरेदीदारांना दिलासा मिळावा यासाठी नुकसान भरपाई वसूल करणे प्राधिकरणाचे मुख्य ध्येय आहे. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती व पाठपुरावा यामुळे या प्रक्रियेला गती मिळाली आहे.”
ReplyForward |