संविधान कीर्तन मालिका

शामसुंदर महाराज सोन्नर

भाग सहा
संतांच्या प्रबोधन चळवळीने मांडलेल्या सुधारणावादी विचारांचे प्रतिबिंब भारतीय संविधानात कसे उमटले आहे, याचा धांडोळा आपण घेत आहोत. भारतीय संविधानाच्या अनुछेद 12 ते 35 मध्ये भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. भारतीय नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार प्रदान करत असतानाच त्यांना काही मूलभूत कर्तव्यही सांगितलेली आहेत. भारतीय संविधानाच्या अनुछेद 51 क मध्ये मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यातील कर्तव्य आणि संत विचारांचा परस्पर काय संबंध आहे, हे आता आपण पाहणार आहोत.
अनुछेद 51क – ड- धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गाच्या भेदाच्या पलिकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे : स्रीयांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणा-या प्रथांचा त्याग करणे.
भारतीय नागरिकांनी धार्मिक तसेच वर्ग भेदाच्या पलिकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लागावा यासाठी संतांनी केलेल्या प्रबोधनाची चर्चा आपण मूलभूत अधिकारावर भाष्य करतानाच सविस्तरपणे केलेली आहे. भाषिक व प्रादेशिक सामंजस्य वाढीस लागावे यासाठीही संतांनी प्रबोधन केल्याचे दिसते. प्रादेशिक तसेच भाषिक भेदाच्या पलिकडे जाऊन संतांनी बंधुभाव कसा वाढविला याचा विचार आता आपण करणार आहोत.
संत नामदेव महाराज यांनी संपूर्ण भारत भ्रमण करून प्रादेशिक बंधुभाव वृद्धींगत केल्याचे दिसून येते. तिर्थयात्रेच्या निमित्ताने नामदेव महाराज यांनी केलेल्या पहिल्या भारत भ्रमणात ज्ञानेश्वर महाराजही त्यांच्या सोबत होते. या भारत भ्रमणामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांनी इतर भाषिक प्रदेशांत त्या त्या भागातील लोकांचे प्रबोधन केले आणि तेथील लोकांनी या दोघांचा सन्मान केल्याचा उल्लेख आपल्या या दोन्ही संतांच्या चरित्रामध्ये पहायला मिळतो. नामदेव महाराज यांनी तर अनेक वेळा भारत भ्रमण करून प्रादेशिक बंधुभाव वाढविण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच भारताच्या विविध प्रांतामध्ये नामदेव महाराज यांचे भक्त मंडळ आजही असल्याचे पहायला मिळतात. पंजामध्ये तर त्यांनी प्रदीर्घ काळ वास्तव्य केले. संतांनी इतर प्रांतातील लोकांशी बंधुभाव वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नातूनच अनेक प्रांताचे लोक वारकरी प्रबोधन चळवळीशी जोडले गेलेले पहायला मिळतात. पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात विविध प्रांताचे लोक सहभागी झालेले दिसतात. अगदी ज्यांना मराठी भाषा येत नाही, असे इतर प्रांतातील वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. इतकेच नव्हे तर देवनागरी लिपी न येणारे इतर प्रांतातील वारकरी संतांचे अभंग आवडीने वारकरी चालीमध्ये गाताना दिसतात. तमिळनाडूतील तुकाराम गणपती आणि त्यांच्या सहका-यांचे उदाहरण मला इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. तुकाराम गणपती यांची भेट काही वर्षांपूर्वी ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या दिंडीत झाली. तेव्हा मी दैनिक “सामना”मध्ये उपसंपादक म्हणून काम पहात होतो. आषाढी वारीनिमित्त बाबा महाराज यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या पालखीच्या मुक्कामी गेलो होतो. संध्याकाळचा हरीपाठ सुरू होता. त्यात मराठी वेशभूषेपेक्षा वेगळी वेशभूषा असलेले लोक हरीपाठात सहभागी असलेले दिसत होते. त्यावरून ते महाराष्ट्रातील नाहीत, हे स्पष्ट दिसत होते. हरीपाठ संपल्यानंतर महाराजांची मुलाखत सुरू झाली, तेव्हा काही मंडळी महाराजांच्या दर्शनासाठी त्यांच्या जवळ आले. महाराज त्यांच्याशी इंग्रजीत बोलत होते, तर ती मंडळी आपसात तमिळ भाषेत बोलत होते. माझ्या चेह-यावरील प्रश्न चिन्ह पाहून मग महाराजांनीच खुलासा केला. “हे तुकाराम गणपती महाराज. हे तमिळनाडूतील आहेत. त्यांना मराठीच नव्हे तर हिंदी सुद्धा येत नाही. देवनागरी लिपी येत नाही. मात्र वारकरी संतांचे अनेक अभंग त्यांना पाठ आहेत. विशेषतः ज्ञानेश्वर महाराज यांचा संपूर्ण हरीपाठ त्यांना आणि तमिळनाडूतून त्यांच्या सोबत आलेल्या अनेक वारक-यांना पाठ आहे. तुकाराम गणपती हे वारकरी संताच्या अनेक मराठी अभंगांचे इंग्रजी आणि तमिळ भाषेत निरुपण करतात.” ही माहिती बाबा महाराज यांनी दिली.
त्यानंतर आमचा संवाद तुकाराम गणपती यांच्याशी सुरू झाला. सातारकर फडाशी आपण कसे जोडले गेले याचा किस्सा तुकाराम गणपती यांनीच सांगितला. ते म्हणाले की, “आषाढी एकादशीची आमच्या कुटुंबाची परंपरागत वारी आहे. माझ्या प्रमाणेच अनेक लोक तमिळनाडूतून येतात. आमचा एक ग्रूप आहे. एका वारीला आम्ही आषाढीला आलो असता चंद्र भागेत स्नान करून आमच्या मुक्कामाकडे जात होतो. तेव्हा बाबा महाराज यांचे साताकर फडावर कीर्तन सुरू होते. त्यातील महाराजांचे गायणे ऐकूण मी भारावून गेलो. आपोआप माझे पाय सातारकर फडाकडे वळले. जमिनीवर मांडी घालून मी कीर्तन ऐकत होतो. महाराज निरुपण मराठीत करीत असल्याने शब्द कळत नव्हते. मात्र गायण आणि त्यांच्या बोलण्यातील भाव आमच्या अंतःकरणातील भक्तीला फूलवत होता. कीर्तन संपले. महाराजांचे दर्शन घेतले. त्यांच्या कीर्तनाच्या आणि हरीपाठाच्या कॅसेट विकत घेतल्या. त्या ऐकूनच आम्ही हरीपाठ पाठ केला. महाराज यांच्याशी संपर्क वाढला. मग त्यांनाच कीर्तनासाठी तमिळनाडू येथे निमंत्रित केले. सात दिवस महाराजांची कीर्तने झाली. त्यांच्या तमिळनाडूतील मुक्कामात संतांचे अभंग बाबा महाराज यांच्याकडून समजून घेतले.” अशी माहिती तुकाराम गणपती यांनी दिली.
असे इतर प्रांतातील अनेक वारकरी आषाढीला पंढरपूरला येतात. दिग्विजयसिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना आणि नंतर अनेक वर्षे आषाढी वारीच्या महापूजेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत सहभागी होत असत. कर्नाटक, गुजरातध्ये अनेक ठिकाणी कीर्तन महोत्सव आणि हरीनाम सप्ताह होतात. वारकरी संतांनी इतर प्रांतातील संतानाही आपल्याशी जोडून घेतल्याचे दिसते. म्हणूनच वारकरी संताच्या साहित्यात इतर प्रांतातील संतांचा आदरपूर्वक उल्लेख केल्याचे पहायला मिळते. वारकरी संप्रदायाचा खांब म्हणून ओळखले जाणारे एकनाथ महाराज उत्तर भारतातील संत सूरदास यांचा गौरव करताना म्हणतात-
जनजसवंत सूरदास संत l
नित्य प्रणिपात वैष्णवाशी ll
तुकाराम महाराज तर उत्तर भारतातील रोहिदास आणि कबीर यांना आपला सोयरा मानताना म्हणतात –
नागो जगमित्र नरहरी सोनार l
रोहिदास कबीर सोयरिया ll
नरसी मेहता, मीराबाई, कबीर या इतर प्रांतातील संतांचे अभंग आपल्याला वारकरी भजनी मालिकेत पहायला मिळतात. संविधानकर्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरू मानतात ते कबीर तर वारक-यांना अत्यंत प्रिय आहेत. कबीरांचे दोहे वारकरी फडावरील भजन आणि कीर्तनातून मोठ्या प्रमाणात गायले जातात. यावरून वारकरी प्रबोधन चळवळीने इतर प्रांतातील संतांशी जोडून घेऊन प्रादेशिक भेदभावाच्या पलिकडे जाऊन बंधूभाव वाढविल्याचे दिसून येते.
केवळ प्रादेशिकच नाही तर भाषिक भेदाच्या पलिकडे जाऊनही वारकरी संतांनी बंधुभाव वाढविल्याचे दिसून येते. म्हणून इतर भाषिक संतांचे अभंग वारकरी भजनी मालिकेत आहेत. त्याच प्रमाणे वारकरी संतांनीही इतर भाषेत लेखन केल्याचे दिसून येते. नामदेव महाराज यांनी तर हिंदी, ब्रीज आणि पंजाबी भाषेत पद्य रचना केलेली आहे. या अभंगातून भक्ती प्रेमाचा निर्मळ प्रवाह जसा संथ गतीने वाहताना दिसतो तशीच वर्णव्यवस्थेतून आलेल्या जात व्यवस्थेतून दिल्या जाणा-या हीन वागणुकीची सल दिसते. अंधश्रद्धेच्या विरोधातील विद्रोहही दिसतो.
भगवंताच्या नामाशी एकरुप झालेले मन, विरहाची उत्कटता त्यांच्या एका हिंदी अभंगातून व्यक्त झालेली आहे. रामनामाशिवाय आपण किती व्याकूळ होतो हे त्यांनी गाय -वासरू आणि माशाचा दृष्टांत देऊन सांगितलेलेले आहे.
मोहि लागत तालाबेली l
बछरे बिनू गाय अकेली l
पानीआ बिनु मीनु तलफै l
ऐसे रामनामा बिनु बापुरो नामा ll
वर्णव्यवस्थेतून आलेल्या जात व्यवस्थेची झळ नामदेव महाराज यांनाही पोहचली होती. नामदेव महाराज पंजाबमधून आल्यानंतर आपले मूळ गाव सध्याच्या हिगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथांच्या मंदिरात कीर्तनासाठी गेले होते. मात्र तेथील पूजा-यांनी त्यांना कीर्तन करू दिले नाही. तेव्हा नामदेव महाराज यांनी मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन केले. आपण केवळ उच्च जातीतले नाही म्हणून आपल्याला अशी वागणुकी दिल्याची सल नामदेव महाराज यांना बोचत होती. आपल्या मनातील भावनांचा कल्लोळ त्यांनी आपला सखा असणा-या पाडुरंगाकडे व्यक्त केली. यावेळी त्यांनी जी तक्रार पाडुरंगाकडे केली ती ब्रीज भाषेत आहे. महाराज लिहितात-
हीनदीन जात मोरी पंढरीके राया l
ऐसा तुने नामा दर्जी काहे को बनया ll
टाल बिना लेकर नामा राऊल मे गया l
पूजा करे बमन उनैन बाहर ढकाया ll
नाना वर्ण गवा एक वर्ण दूध l
तूम काहे के बमन हम काहे के सूद ll
अशी अनेक हिंदी, ब्रीजभाषी, पद नामदेव महाराज यांनी लिहिलेली आहेत. त्यांच्या एकाच गवळणीत मराठी, कानडी, मुसलमानी, कोकणी आणि गुजराती भाषा आलेली आहे.
गवळणी ठकविल्या l
गवळणी ठकविल्या l
एक एकसंगतीने मराठी कानडिया l
एक मुसलमानी कोकणी गुजरणी l
ऐशा पाचजणी गवळणी ठकविल्या ll
या पाच भाषेतील गवळणीचा कृष्णाशी संवाद आहे. नामदेव महाराज यांचे अभंग “गुरुग्रंथ साहेबा” या शीख धर्माच्या पवित्र ग्रंथात आहेत, याचा उल्लेख आपण पाहिलेला आहेच.
तुकाराम महाराज यांनीही हिंदीतून अनेक अभंगाची, गवळणीची रचना केली आहे. भगवंताशी एकरूप झालेली गवळण आपलं सर्वस्व कसं विसरून जाते याचे वर्णन तुकाराम महाराज यांनी एका हिंदी अभंगातून केले आहे.
मै भूली घरजानी बाट l
गोरस बेचने आयी हाट ll
कान्हा रे मनमोहन लाल l
सबही बिसरू देखे गोपाल ll
कहा पग डारू देखे आनेरा l
देखे तो सब वहिने घेरा ll
हूं तो थकित भई रे तुका l
भागा रे सब मनका धोका ll3
भाषिक भेदाच्या पलिकडे जाऊनही वारकरी संतांनी बंधुभाव वाढविल्याची अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणजे अनुछेद 51क-ड मध्ये जी मूलभूत कर्तव्य सांगितली आहेत, ती समाज मनात रुजविण्याचा प्रयत्न संतांच्या प्रबोधन चळवळीने अनेक शतकं केलेला आहे.
याच अनुछेदामध्ये स्रीयांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणा-या प्रथांचा त्याग करणे करणे हे कर्तव्य संविधानामध्ये समाविष्ट केले आहे. संतांनी स्रीयांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कसा प्रयत्न केला आहे, हे विस्ताराने या पूर्वीच पाहिले आहे. त्यामुळे येथे परत तो विषय घेतला तर पुनरुक्तीचा दोष लागेल.
संविधानाच्या अनुछेद 51क-छ – वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवशृष्टी यांच्यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे.
संत साहित्यात एकंदरच पर्यावरण रक्षणाबाबत अनेक ठिकाणी उल्लेख आल्याचा आपल्याला दिसून येतो. वर उल्लेखलेल्या मूलभूत कर्तव्याची जाणीव ज्ञानेश्वर महाराज यांनी एकाच ओवीत करून दिल्याचे दिसते.
नगरेचि रचावी l
जलाशये निर्मावी l
महा वने लावावी l
नानाविध ll
आपल्याला एखाद्या नगराची रचना करायची असेल तर महाराज म्हणतात आधी जलाशयाची निर्मिती करा. जलाशयाची निर्मिती करायची असेल तर नद्या आणि सरोवरांचे संरक्षण करावेच लागते. त्याच बरोबर महावने लावावी, असा संदेशही या ओवीमध्ये देण्यात आलेला आहे.
तुकाराम महाराज यांनीही पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत असताना वृक्ष आणि वल्ली आपले सोयरे असल्याचे आवर्जुन सांगितलेले आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे l
पक्षी ही सुस्वरे आळविती ll
यात वृक्षाबद्दल जिव्हाळा व्यक्त करीत असतानाच वन्यजीव शृष्टीबद्दल आपुलकी व्यक्त केलेली दिसते. प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगण्याचा सल्ला देताना तुकाराम महाराज अन्य एका अभंगात म्हणतात-
भूतदया गायी पशूचे पालन l
तहानेल्या जीवन वनामाजी ll
अशा प्रकारे भारतीय संविधानाने सांगितलेल्या मूलभूत कर्तव्याशी सुसंगत अशी जाणीव जागृती संतानी केल्याचे दिसून येते.
संविधानातील मूलभूत कर्तव्यामध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी व सुधारणावाद विकसित करणे हे कर्तव्य आहे. याबाबत संत प्रबोधन परंपरेची काय भूमिका होती हे आपण पुढील भागात पाहणार आहोत.
संपर्क : 9892673047
9594999409

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *