सोलापूर: माळशिरसमधील मारकडवाडी गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. आज, सोमवारपासून ते 5 डिसेंबरपर्यंत मारकडवाडीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आले आहेत. असे असले तरी ईव्हिएमचा झोल उघड करण्यासाठी मतदानपत्रिकेवर प्रतिकात्मक मतदान मारकवाडीत घेतले जाणार असल्याचे गावकऱ्यांनी आज जाहीर केले.
गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने जमावबंदी लागू केली आहे. मारकडवाडी गावकऱ्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत मंगळवारी 3 डिसेंबर रोजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचं जाहीर केलं होतं.
मारकडवाडीमध्ये मंगळवारी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतली. यानंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाशिवाय इतर कोणतीही यंत्रणा अशा पद्धतीने मतदान घेऊ शकत नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मंगळवारी मतदानाची प्रक्रिया राबल्यास त्या नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
माळशिरच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजया पांगरकर यांनी तसे आदेश जाहीर केले आहेत. भारतीय न्याय संहितेचे कलम 163 नुसार ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जर आदेशाचे भंग करून मतदान प्रक्रिया राबविली तर सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मतपत्रिकेवर उद्या मतदान प्रक्रिया राबवणाचा निर्णय घेतलेल्या माळशिरसमधील मारकडवाडी गावाला पोलीस छावणीचं स्वरुप आलं आहे. मात्र मतदान प्रक्रिया राबवू नये यासाठी प्रशासनाकडून दबाव टाकण्यात आाल होता. प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतर ग्रामस्थांनी बैठक घेतली. आता जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर मारकटवाडी गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाल्याने परिस्थिती काहीशी तणावाची बनली आहे.