ठाणे : एकीकडे देशात मुलींच्या शिक्षणासाठी कोट्यावधींच्या निधीसह विविध योजना राबवल्या जात असल्या तरी आजही जिल्ह्यात शिक्षण सुटल्याने मुलींच्या लग्नगाठी बांधल्या जात असल्याचे दिसून आले आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १५ बालविवाह रोखण्यात यश आले आहे. यातील जवळपास सर्वच मुलींचे शिक्षण थांबले होते. मुलींची सुरक्षितता आणि भविष्याचा विचार करून पालकांनी मुलींचे लग्न लावणे पसंत केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सर्व कुटुंब गरीब पार्श्वभूमीतून येतात.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. तर मुरबाडमध्येही आदिवासींची संख्या मोठी आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या या समाजात मुलींची लग्न लवकर लावून देण्याचे अनेक प्रकार दिसून येतात. यासह शहरी भागातही आर्थिक चणचण असलेल्या कुटुंबांमध्ये लहान वयात मुलींच लग्न करण्याचे प्रकार समोर आले आहेत. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यात ठाणे जिल्ह्यात १५ बालविवाह रोखण्यात यश आले आहे. यातील १२ बालविवाह शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील आहेत. तर टिटवाळा, भिवंडी आणि नवी मुंबई येथील प्रत्येकी एक बालविवाह रोखला आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात यंदा सर्वाधिक बालविवाह रोखण्यात आल्याचे दिसून आले आहे. यातील काही विवाह विवाहाच्या आदल्या दिवशी, काही विवाह हळदीच्या तर काही विवाह थेट लग्नाच्या दिवशी रोखण्यात आले आहेत. विशेष म्हणजे जे १५ विवाह रोखण्यात आले त्या सर्व विवाहांमध्ये मुली अल्पवयीन होत्या. तर सर्वच मुलींचे शिक्षण विवाहावेळी थांबलेले होते. या सर्व मुली १३ ते १७ या वयोगटातील होत्या. त्यामुळे शिक्षण सुटली की लग्नगाठ नक्की अशीच काहीशी स्थिती दिसते आहे.
सुरक्षित शिक्षण गरजेचे
मुरबाड आणि शहापूर तालुक्यांमध्ये आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांना या बालविवाहाबद्दल विचारले असता त्यांनी सुरक्षित शिक्षणाअभावी बालविवाह होत असल्याची बाब अधोरेखीत केली आहे. मुलींचे शिक्षण थांबले की त्यांचे लग्न लावून दिले जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. शिक्षण थांबले की मुलींची सुरक्षितता हा प्रश्न कुटुंबांपुढे येतो. त्यामुळे मुलींच्या सुरक्षित शिक्षणासाठी पाऊले उचलणे आवश्यक आहे. असे इंदवी तुळपुळे यांनी सांगितले आहे.
0000