डोंबिवली : येथील पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील गरीबाचापाडा येथील श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोलनगरी प्रस्तावित सिमेंट काँक्रीटच्या १५ मीटर रस्त्याला बाधित होणारे २५ व्यापारी गाळे कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभागाच्या तोडकाम पथकाने साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी तोडून टाकले.
या रस्त्यावरील गाळे तोडून टाकल्याने सिमेंट काँक्रीटचा रस्ता प्रशस्त होण्यास साहाय्य होणार आहे. गरीबाचापाडा येथील श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोलनगरी रस्ता पालिकेच्या टिटवाळा येथून येणाऱ्या वळण रस्त्याचा पोहच रस्ता आहे. आताचा श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी रस्ता दोन्ही बाजुच्या अतिक्रमणांमुळे २५ ते ३० फूट रूंदीचा आहे. या रस्त्यावर अवजड वाहन आले की नेहमीच या रस्त्यावर वाहन कोंडी होते. गेल्या तीन महिन्यापूर्वी एमएमआरडीएच्या ठेकेदाराने पालिकेकडून अतिक्रमणे काढून मिळाली नाहीत म्हणून आहे त्या रस्त्यावर खोदकाम करून सीमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू केले होते.
आताच्या ३० फुटाच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले तर येणाऱ्या काळात हा रस्ता वाहतूक कोंडीत अडकेल. श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी रस्त्याचे रुंदीकरण झालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत सामाजिक कार्यकर्ते बाळा म्हात्रे, ॲड. गणेश पाटील, मनोज वैद्य, अनमोल म्हात्रे, संजय म्हात्रे यांनी घेतली. ॲड. गणेश पाटील यांनी रूंदीकरण न करता या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले तर या रस्ते कामाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका घेतली.
नागरिकांचा होणारा विरोध लक्षात घेऊन ठेकेदाराने श्रीधर म्हात्रे चौकातील काँक्रिटीकरणासाठी खोदलेला रस्ता बुजवून टाकला. जोपर्यंत पालिका या रस्त्यावरील अतिक्रमणे काढत नाही, तोपर्यंत या रस्त्याचे काँक्रिटीकरण न करण्याचा निर्णय घेतला. पालिका शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी या रस्त्याचे रूंदीकरण करूनच काँक्रिटीकरण केले जाईल, असे आश्वासन रहिवाशांना दिले.
फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी या काँक्रीट रस्ते कामात अडथळा येणाऱ्या २५ गाळेधारकांना दोन महिन्यापूर्वी नोटिसा देऊन आपली अतिक्रमणे स्वताहून काढून घेण्याचे सूचित केले होते. सोमवारी साहाय्यक आयुक्त सावंत यांनी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून श्रीधर म्हात्रे चौक भागातील २५ व्यापारी गाळे जेसीबी, तोडकाम पथकाच्या साहाय्याने तोडून टाकले. या कारवाईच्यावेळी विष्णुनगर पोलिसांचा बंदोबस्त होता.
कोट
श्रीधर म्हात्रे चौक रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम आता सुरू होणार असल्याने त्या कामाला अडथळा ठरणारी २५ अतिक्रमणे आयुक्त डाॅ. इ्ंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून तोडून टाकण्यात आली. आता ठेकेदाराचा रस्ता बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. -राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.
कोट
श्रीधर म्हात्रे चौक रस्त्याचे भविष्याचा विचार करून रूंदीकरण होणे गरजेचे होते. पालिकेने या रस्त्यावरील अतिक्रमणे काढल्याने आता हा वर्दळीचा रस्ता प्रशस्त होणार आहे. वाहन कोंडीचा महत्वाचा प्रश्न सुटणार आहे. -ॲड.गणेश पाटील, रहिवासी.
००००