नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर सहा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या दैनंदिन बाजाराची इमारत वापराविना पडून आहे. बाजाराचे उद्घाटन न झाल्याने हा बाजार धूळखात पडून आहे. मात्र काही लोकांनी या मोकळ्या जागेचा वापर करत बेकायदा व्यवसाय सुरू केला आहे तर आसपाच्या मटण विक्रेते ही जागा शेळ्या बांधण्यासाठी वापरत आहेत. अनेकांनी भंगार गाड्या ठेवल्या आहेत.

कोपरखैरणे विभाग कार्यालयापासून पायी दोन चार मिनिटांच्या अंतरावर सेक्टर ६ येथे कोट्यवधी रुपये खर्च करून दैनंदिन बाजाराची उभारणी करण्यात आली होती. मात्र सुमारे तीन वर्षांपासून हा दैनंदिन बाजार धूळखात आहे. वापरात नसल्याने बेवारस अवस्थेत असलेल्या या बाजाराच्या शेडचा रंग उडाला असून अनेक ठिकाणी फरशा खराब झाल्या आहेत. हा सर्व परिसर दाट लोकवस्तीचा आणि गजबजलेला आहे. याच बाजारासमोर मोठ्या प्रमाणात मटण चिकनची दुकाने असून येथील काही दुकान मालक आपल्या बकऱ्या, शेळ्या याच बाजार शेड मध्ये बांधून ठेवतात. या शेळ्यांच्या मलमूत्रामुळे कमालीची दुर्गंधी येत असते. बाजाराजवळ राहणाऱ्या रहिवाशांना ही दुर्गंधी सहन करावी लागते. याबाबत विचारणा केली असता वाद होतात. आम्ही मोफत शेळ्या बांधत नाही, त्यासाठी पैसे मोजतो, असे म्हटले जात असल्याचा आरोप परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने नाव न छापण्याच्या विनंतीवरून केला. याच बाजाराच्या आवारात एक नारळ विक्रेता, फळ विक्रेता आणि रसवंती सुरू आहे. त्यातील एकाने आम्हाला फुकट कसे धंदा करू देतील द्यावेच लागतात पैसे असे सांगितले. मात्र हा पैसा नेमका कोणाकडे जातो हे मात्र गुलदस्त्यात. त्यामुळे मनपाच्या नावावर हा मलिदा नेमका कोण खातो असा प्रश्न समोर येत आहे.

या बाबत स्थानिक माजी नगरसेवक संगीता म्हात्रे यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या की करोना काळात इमारत झाली असून सुरू करण्याची मागणी आम्ही केली होती. दरम्यान, याच परिसरातील माजी नगरसेवक तथा माजी विरोधीपक्ष नेते विजयानंद माने यांना विचारणा केली असता नेत्यांना वेळ नसल्याने या इमारतीचे उद्घाटन रखडले असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र उद्धाटन झाले नसले तरी काही दिवस हा बाजार सुरू होता अशीही माहिती समोर आली आहे.

कोट

अनधिकृत फेरीवाल्यांना ओटे देण्यात आलेले आहेत. नेमकी काय परिस्थिती आहे याची पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल. सुनील काठोळे, सहाय्यक आयुक्त, कोपरखैरणे विभाग मनपा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *