मुंबई:- मुंबई उपनगर कबड्डी असो.ने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत नवशक्ती स्पोर्ट्स यांनी महिला गटात, तर बालमित्र मंडळ यांनी पुरुष गटात ५-५ चढायांच्या डावात दुसऱ्या फेरीत धडक दिली. कांदिवली, सेक्टर – २ येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर संयोजन अँडव्हटायजिंग आणि मार्केटिंग प्राईव्हेट ली.च्या संचालिका नम्रता भोसले यांच्या सौजन्याने मुंबई उपनगरने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. महिलांच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात नवशक्तीने ५-५ चढायांच्या डावात विशाल स्पोर्टस् चा कडवा प्रतिकार २५-२० असा मोडून काढला. पहिल्या डावात ७-८ अशा पिछाडीवर पडलेल्या नवशक्तीने दुसऱ्या डावात आपला खेळ उंचावत १७-१७ अशी बरोबरी साधली आणि जादा डावात ५गुणांनी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रविना थोरात, गायत्री देवळेकर यांच्या संयमी खेळाला या विजयाचे श्रेय जाते. अंकशिता लाड, दिपाली कलमकर यांनी विशाल स्पोर्टस् कडून कडवी लढत दिली.
पुरुषांच्या प्रथम श्रेणी(अ) गटात बालमित्र मंडळाने ५-५ चढायांच्या डावात एस.के. कबड्डी संघावर २३-२० अशी मात केली. अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात पूर्वार्धात ७-५ अशी एस.के. संघाकडे आघाडी होती. उत्तरार्धात बालमित्रच्या किरण मोरे, ओमकार पाटील यांनी आपला खेळ उंचावत संघाला १५-१५ अशी बरोबरी साधून दिली आणि पाच चढायांच्या डावात ३ गुणांनी विजय देखील मिळवून दिला. कुलदीप व अभिषेक या आंग्रे बंधूनी निकराची लढत दिली.परंतु जादा डावात ते कमी पडले. ओवळी(ब) मंडळाने देऊळवाडी ओवळी संघाचा २०-११ असा सहज पाडाव केला तो ऋतिक सोनावणे, विराज कदम यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर. देऊळवाडीचा विघ्नेश कासार बरा खेळला. केदारनाथ मंडळाने निर्विघ्न स्पोर्टस् चा ३२-०४असा धुव्वा उडविला. किरण व निखिल या कदम बंधूच्या झंझावाती खेळामुळे केदारनाथला हे शक्य झाले.
महिलांच्या सामन्यात महात्मा गांधी स्पोर्टस् ने संघर्ष मंडळाचा ४१-२५ असा पाडाव केला. विश्रांतीला १३-०७ अशी महात्मा गांधी संघाकडे आघाडी होती. विश्रांतीनंतर खेळ अधिक गतिमान खेळाला गेला. प्रतिक्षा सर्वसाने, हर्षा लोंढे महात्मा गांधी कडून, तर प्राची खेडेकर, सृष्टी कोबकर संघर्ष कडून उत्कृष्ट खेळल्या. प्रबोधन मंडळाने जगदंब मंडळाचा ४६-१९ असा पराभव केला. पूर्वार्धात २३-१४ अशी आघाडी घेणाऱ्या प्रबोधनने उत्तरार्धात देखील खेळाचा जोश कायम राखत २७ गुणांच्या मोठ्या फरकाने आपला विजय साकारला. आचल पाल, शुभांगी कदम यांच्या सर्वांगसुंदर खेळाला या विजयाचे श्रेय जाते. जगदंबची आसावरी पताने एकाकी लढली.