हरिभाऊ लाखे
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत काहीसा बाजूला पडलेला शहरातील खड्ड्यांचा विषय मनसेने पुन्हा ऐरणीवर आणला आहे. पावसाळा संपुष्टात येऊन एक, दीड महिना उलटूनही शहरातील रस्त्यांची दुर्दशा दूर झालेली नाही. खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. आरोग्याचे प्रश्न कायम आहेत. याविषयी आठ दिवसात कारवाई न झाल्यास मनसे पद्धतीने आंदोलनाचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. या इशाऱ्यानंतर महापालिकेने खड्डे व रस्ते दुरुस्तीबाबत तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित केल्याचे सांगत त्यावर कार्यवाही केली जाणार असल्याचे म्हटले आहे.
पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची वाट लागली. विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या खोदकामात नंतर योग्यप्रकारे दुरुस्ती केली जात नाही. पावसाने उघडीप घेतल्यानंतर महापालिकेने खड्डे व रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यवधींच्या कामांना मान्यता दिल्याचे सांगितले जात होते. परंतु, आजही अनेक भागात रस्त्यांची अवस्था बिकट आहे. या पार्श्वभूमीवर, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, माजी सभागृह नेते दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आदींनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन रस्त्यांसह आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
मनपा हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांसह कॉलनी रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मनपाने अनेकदा खड्डे बुजविण्याचे ठेके दिले. परंतु, नावापुरती मलमपट्टी झाल्यामुळे खड्डे पूर्ववत झाले. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. अनेक ठिकाणी अस्वच्छता आहे, यामुळे नागरिकांंना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत आहे. या प्रश्नांबाबत वारंवार दाद मागूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. खड्ड्यांची दुरुस्ती, आजारावर नियंत्रण आणि पाणी पुरवठ्याच्या समस्या आठ दिवसात न सोडविल्यास आंदोलन छेडून धडा शिकवला जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
मनपाचे तक्रारी करण्याचे आवाहन
शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि दरुस्तीबाबतच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी महापालिकेने चारस्तरीय यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मनपाचे संकेतस्थळ, इ कनेक्ट भ्रमणध्वनी ॲप, ७०३०३००३०० ही मदतवाहिनी आणि ७९७२१५४७९३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर नागरिकांना तक्रारी व सूचना करता येतील, असे मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी म्हटले आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *