आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांंच्याकडून मराठी शाळांची पाहणी
डोंबिवली : मराठी शाळांची पटसंख्या वाढविणे त्याचबरोबर विनापरवानगी रजेवर जाणाऱ्या शिक्षकांची विनावेतन रजा मंजूर करावी तसेच वेळेत शाळेत हजर न राहणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी शिक्षण विभाग अधिकाऱ्यांना दिल्या. सोमवारी आयुक्त डॉ. जाखड यांनी महापालिकेच्या मराठी शाळांची पाहणी केली. या वेळी आढळून आलेल्या त्रुटींवर काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी महापालिकेच्या शाळा क्रमांक ३३ धाकटे शहाड, शाळा क्रमांक ६३ मिलिंद नगर, शाळा क्रमांक ६८ बारावे या तीन शाळांना भेटी दिल्या. याभेटींदरम्यान शाळा इमारत, वर्गखोल्या, दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधा तसेच शाळा परिसराची त्यांनी तपशीलवार पाहणी केली. शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी वर्ग सुरू असताना संवाद साधला. या वेळी त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सुविधांविषयी चर्चा केली. या वेळी शिक्षण विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, प्रशासन अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी विजय सरकटे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.