मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा देवेंद्र फडणवीसांची नावाची घोषणा होताच मनोज जरांगे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत होते म्हणून आम्ही त्यांचा विरोध केला. सत्तेत असतो त्याच्याशीच भांडावं लागतं. सरकार म्हणून आरक्षण देणारे ते होते म्हणून आम्ही त्यांच्याशी भांडलो. कारण मराठा समाजाच्या गोरगरीबाच्या आरक्षणाचा प्रश्न होता. मी पुढेही भांडणार आहे आणि नुसतं भांडण नाही तर सोडणार सुद्धा नाही. सरकारला गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागतील. त्यामुळे सरकारमध्ये कोणी पण कोणत्याही पदावर बसू दे मी सोडणार नाही. उपोषण होणार म्हणजे होणारच असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला आहे.

उपोषण अंतरवलीत होणार. पण थोडं पुढे जायचं असे काही लोक म्हणतात. आझाद मैदानावर उपोषण होण्याची देखील शक्यता आहे. उपोषण होणार असून ते सामूहिक उपोषण होणार आहे. मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. असेही मनोज जरांगे म्हणाले. दरम्यान, प्रत्येकाला उपोषण करण्याचा अधिकार आहे. मी कधीच ओबीसी बांधव आणि त्या समाजाला विरोधक मानलेले नाही. मी सामान्य ओबीसींना एका शब्दाने देखील दुखावले नाही. आम्हाला ओबीसीचां विरोध नाही. थोड्याफार नेत्यांचा विरोध आहे. तुमच्यामुळे धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही, त्यांचे नेते विनाकारण आमच्या विरोधात जात आहेत. सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे. सगळ्या आमदारांना मराठे आता बोलायला लावणार. असेही ते म्हणाले.

मराठ्यांपुढे कोणतेही सत्ता टिकू शकत नाही- मनोज जरांगे

मराठ्यांची बेमानी करायची नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे. सत्ता आली किंवा बहुमताने आलो म्हणून बेईमानी करायची नाही. पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही. मराठ्यांपुढे कोणतेही सत्ता टिकू शकत नाही. एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचे काही खरं नाही. सत्ता आली म्हणून मस्तीत यायचं नाही आणि वेड्यावानी करायचं नाही. मस्ती मराठ्यांपुढे टिकत नाही आणि आम्ही ती टिकू देणारही नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *