नवी मुंबई : महानगरपालिका इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राव्दारे दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून 03 डिसेंबर म्हणजेच जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ,कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर महिन्यामध्ये विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमधून दिव्यांगत्वाबाबत समाजामध्ये जनजागृती करणे तसेच दिव्यांग मुलांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.
या अंतर्गत जागतिक दिव्यांग दिनी 3 डिसेंबर रोजी दिव्यांगात्वाबाबत जनजागृतीकरिता रॅलीचे आयोजित करण्यात आले होते. या रॅलीमध्ये नमुंमपा इटीसी केंद्रातील विविध प्रवर्गातील दिव्यांग मुले व त्यांचे पालक तसेच केंद्रातील शिक्षक व कर्मचारी आणि सर्व शिक्षा अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी सहभागी झाले होते.
सकाळी 9.30 वा. इटीसी केंद्रामधून या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. रॅली वाशी स्टेशन परिसरात आल्यानंतर त्याठिकाणी मानवी साखळी करून दिव्यांगत्वाबाबत माहिती दर्शविणारे फलक उंचावत तसलेच जनजागृतीपर घोषणा देत दिव्यांगत्वाबाबत लोकजागृती करण्यात आली. या रॅलीची सांगता वाशी परिसरात फिरून पुन्हा इटीसी केंद्र याठिकाणी करण्यात आली. रॅलीनंतर दिव्यांग मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
अशाच प्रकारचे विविध उपक्रम डिसेंबर महिन्यात राबविण्यात येत असून डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात मानसिक स्वास्थ्य या विषयावर इटीसी केंद्रातील पालक व शिक्षक यांच्याकरिता कार्यशाळा घेण्यात येणार आहे. दुस-या आठवडयात विशेष मुले, पालक व शिक्षक यांची नेरूळ येथील बहुचर्चित पर्यटन केंद्र वंडर्स पार्क येथे लाईट शो पाहण्यासाठी सहल नियोजित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या विशेष मुलांना स्पर्शामागील हेतूचे आकलन व्हावे यादृष्टीने ‘गुड टच – बॅड टच’ याबाबत एक विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. याप्रसंगी विशेष मुलांच्या पालकांसाठीही कायदेशीर बाबींबाबत मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात येत आहे.
या महिन्यातील दिव्यांग मुलांचा सर्वात आवडता उपक्रम म्हणजे वेशभूषा स्पर्धा. त्याचेही आयोजन करण्यात आले आहे. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग मुलांसाठी आयोजित केल्या जाणा-या समन्वय क्रीडा स्पर्धांमध्ये इटीसी केंद्रातील विशेष विदयार्थी सहभागी होणार आहेत. अशाप्रकारे केवळ 3 डिसेंबर रोजीच्या जागतिक दिव्यांग दिनाच्या एक दिवसापुरतेच नाही तर संपूर्ण डिसेंबर महिन्यात दिव्यांगांकरिता विविध प्रकारच्या विशेष उपक्रमांचे आयोजन इटीसी दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे.
