स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानने घेतला पुढाकार

 

मुंबई : स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान या दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी मूलभूत कार्य करणाऱ्या बोरिवली पूर्व येथील संस्थेने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त हेल्थ मॉनिटर प्रोग्राम फॉर दिव्यांग(HMPD) हा उपक्रम सुरू केला आहे. जवळजवळ 100 दिव्यांग व्यक्ती आणि 40 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एका अनोख्या पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात आला. दिव्यांग व्यक्तींचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्या समाजात दुर्लक्षित आहे. दिव्यांग व्यक्तीला आलेल्या अपंगत्वामुळे वयोमानपरत्वे त्यांच्या शारीरिक अडचणी वाढत जातात आणि या शारीरिक व्याधी त्याचे जीवन अत्यंत त्रासाचे करतात आणि म्हणूनच जर वेळीच बेसिक हेल्थ चेकअप, डॉक्टरांचे मार्गदर्शन, योग्य ती औषधे, आवश्यक फिजिओथेरपी अशी बेसिक हेल्थकेअर जर दिव्यांग व्यक्तींना अत्यंत वाजवी दरात उपलब्ध झाली तर त्यांचे एकंदरीत शारीरिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होईल, या एकमेव उद्देशाने हेल्थ मॉनिटर प्रोग्राम फॉर दिव्यांग (HMPD)हा अभिनव उपक्रम स्नेहज्योत संस्थेने हाती घेतला आहे, ज्याचा शुभारंभ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली पूर्व येथील एन आय सी ऑडिटोरियम मध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त करण्यात आला.
गेली जवळजवळ 35 वर्षाहून जास्त मेडिकल क्षेत्रात अनुभव असणारे प्रोफेसर डॉ. हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्णत्वाला येणार आहे. HnG पॅथॉलॉजी आणि डायग्नोस्टिक हेल्थकेअर, आशा हेल्थकेअर, NM मेडिकल सेंटर या उपक्रमाशी संलग्न आहेत. या उपक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्तींना आयुष्मान कार्ड काढून देण्यात येईल, आवश्यक असणाऱ्या टेस्ट वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच त्यांच्या विभागात वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये त्यांना आवश्यकता भासल्यास मोठ्या सर्जरीज मोफत करून घेण्यात येऊ शकतील, अशा पद्धतीचा आरोग्य संबंधीचा डेटाबेस एका हेल्थ डेस्क च्या माध्यमातून करता येईल का? या दिशेने या उपक्रमाचा विस्तार केला जाईल.
कृष्णा शेठ या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दृष्टिहीन तायक्वांडो प्लेयर चा ‘स्नेहज्योत शक्तिशाली व्यक्तिमत्व पुरस्कार 2024’ हा अत्यंत मानाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच आपल्या अपंगत्वावर मात करून झोमॅटो डिलिव्हरी बॉय चे काम करत स्वतःचे आयुष्य स्वावलंबनाने जगणाऱ्या श्री हरिशंकर शर्मा यांचा ‘स्नेहज्योत धैर्यशील व्यक्तिमत्व पुरस्कार 2024’ देऊन गौरव करण्यात आला. या दोघांनी आपले अनुभव कथन करत उपस्थितांसमोर एका वेगळ्या जिद्दीचे आणि मनोबलाचे उदाहरण ठेवले. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व दिव्यांग मुलांना संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नॅशनल पार्क मधील लायन सफारी टूर घडवून आणली आणि मग मस्तपैकी चिंचा, बोरे, कैऱ्या खाऊन सर्व दिव्यांग व्यक्तींच्या दिवसाची आनंदाने सांगता झाली.
या कार्यक्रमाला संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे तहसीलदार अतुल सावे, अकाउंटंट रविदास गवळी, तलाठी चिराग सुळे, फेरो इक्विपचे रोड्रिक्स फर्डी, सुविद्या प्रसारक संघाचे श्री महादेव रानडे, एन एम मेडिकल सेंटरचे प्रतिनिधी हर्षिल परमार, स्नेहज्योत शुभचिंतक सौ अहिल्या कुलकर्णी, डॉ. श्रीकांत ठाकूर, एस एस बॅग्स चे संजय दळवी तसेच प्रोफेसर हेमंत शिंदे आणि त्यांची टीम उपस्थित होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे विश्वस्त विजय कलमकर यांनी केले.  लायन सफारी ही इनरव्हील क्लब ऑफ मुंबई, दहिसर यांच्याकडून प्रायोजित करण्यात आली होती.
हे दिव्यांग पुनर्वसनाचे कार्य स्नेहज्योत परिवारातील सर्व सेवाव्रतींमुळेच होऊ शकते, असे संस्थेच्या संस्थापिका व सचिव सौ सुधा वाघ यांनी आवर्जूनपणे नमूद केले.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *