महापालिका नोटीस बजावणार
मुंबई- वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने आता बेकऱ्यांवरील कारवाईकडे लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. मुंबईतील सर्व बेकऱ्यांची झाडाझडती घेण्यात येणार आहे. यात इंधन म्हणून लाकडाचा वापर करून प्रदूषण पसरवणाऱ्या बेकायदेशीर बेकऱ्यांना पालिका नोटीस बजावणार आहे. तसेच, बेकऱ्या बंद करण्याबाबत कायदेशीर तरतूद करण्यासाठीही एमपीसीबीसी चर्चा करणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मुंबईत विविध ठिकाणी अनधिकृतपणे बेकऱ्या उभ्या राहिल्या आहेत. मुंबईत १,२०० बेकऱ्या आहेत. त्यामध्ये सुमारे निम्म्या बेकऱ्या बेकायदेशीर आहेत. मुंबई महापालिकेने २००७ सालापासून इलेक्ट्रिक वापराच्या अटीवर सुमारे ३५० बेकऱ्यांना परवानग्या दिल्या आहेत. असे असताना निम्म्या बेकऱ्यांमध्ये इंधन म्हणून लाकडाचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. लाकडाच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईतील सर्व बेकऱ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बेकऱ्यांमध्ये लाकडाचा वापर होत असल्याने प्रदूषण वाढते. त्यामुळे लाकडाऐवजी स्वच्छ इंधनाचा वापर करणे आवश्यक आहे.
लाकडाचा वापर केल्याने हानिकारक प्रदूषकांचे उत्सर्जन होते. यामध्ये पार्टिक्यूलेट मॅटर, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि व्होलटाइल ऑर्गेनिक कंपाउंड्स यांसारख्या प्रदूषक उत्सर्जनामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. हे नियम न पाळणाऱ्यांवर सात ते आठ बांधकामांच्या ठिकाणी पालिकेने कारवाईही केली आहे. ही कारवाई सुरू असतानाच आता पालिका मुंबईतील सर्व बेकऱ्यांची झाडाझडती घेणार असल्याचे सांगण्यात आले.
लाकडाच्या वापरामुळे आजार
बेकरींमधील उत्सर्जन हे पीएम १० आणि पीएम २.५ यांचे प्राथमिक स्रोत आहे. ज्यांचे सूक्ष्म कण फुप्फुसांमध्ये अगदी आतापर्यंत पोहोचत असल्यामुळे श्वसनाच्या, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरतात. भंगार लाकूड जाळल्याने तयार होणारे व्हिओसीज हे कर्करोग, अस्थमा आणि इतर अनेक आजारांसाठी कारणीभूत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
