महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदासाठी आज शपथविधी !
मुंबई – फडणवीस ! फडणवीस !! फडणवीस!!! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहे. यापुर्वी केवळ शरद पवार यांनाच तिनदा मुख्यमंत्री होता आले आहे. अनेक विक्रम मोडीत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. भाजपा विधीमंडळ नेतेपदी फडणवीसाच्या एकमताने निवड होताच अवघ्या महाराष्ट्रात आंनदाची लहर उमटली. महायुतीच्या कार्यकर्यांनी महाराष्ट्रभर एकच जल्लोष केला.
पक्ष निरीक्षक म्हणून राज्यात आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे अखेर ठरलं आहे. भाजपा विधिमंडळाच्या या बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांनी दुपारी राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. लगोलग राज्यपालांनी त्यांना उद्या आझादमैदानावर शपथविधीसाठी पाचारण केले.
सकाळी ११ वाजता विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक होती. या बैठकीत भाजपाचे १३२ आमदार त्याशिवाय भाजपाला पाठिंबा दिलेले ५ इतर आमदारही उपस्थित होते. बैठकीपूर्वी भाजपा नेते, आमदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या बैठकीसाठी विधानभवन फुलांनी सजवलं होते. त्याशिवाय भाजपा आमदारांनी भगवे फेटे घातले होते. या बैठकीला सुरुवात होण्याआधी नेत्यांनी पक्षाचे निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांचे स्वागत केले. बैठकीआधी भाजपा कोअर कमिटीची बैठक पार पडली. यात प्रस्ताव कोण मांडणार, सूचक, अनुमोदक कोण असणार हे ठरवण्यात आलं. तोपर्यंत भाजपा आमदार सेंट्रल हॉलमध्ये जमले होते. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सगळे नेते सेंट्रल हॉलमध्ये पोहचले.
या बैठकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला पंकजा मुंडे, प्रविण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुटे, संजय सावकारे, अशोक उइके, आशिष शेलार, योगेश सागर, गोपीचंद पडळकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर या प्रस्तावाला भाजपाच्या सर्व आमदारांनी एकमताने मंजुरी दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र अखेर भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मुंबई, नागपूर येथील भाजपा कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, ढोलताशे वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
अजित पवारांचा बाऊंसर
अन् शिंदेंचा षटकार
राज्यपाल भवनावर सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे केल्यानंतर तेथे आयोजित पत्रकार परिषदेत राजकीय टोलेबाजी पहायला मिळाली. पत्रकारपरिषदेत प्रास्ताविक करताना फडणवीसांनी या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी व्हावे अशी आपण त्यांना विनंती केल्याचे सांगितले. यावर संध्याकाळी याबाबत आपण संध्याकाळी चर्चेअंती यावर निर्णय घेऊ असे एकनाथ शिंदे म्हणाले. यावर अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी करताना एकनाथ शिंदेंवर बाऊंसर टाकला. एकनाथ शिंदेंजींचे संध्याकाळी कळेल पण मी तर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. मैं रुखनेवाला नहीं हू असे म्हणताच एखच हास्यकल्लोळ उसळला. हजरजबाबी एकनाथ शिंदेंनी यावर सिक्सर हाणताना अजिद दादांना सकाळी आणि दुपारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची सवय आहे असे म्हणताच हास्याचा कडेलोट झाला… आणि वातावरणातील तणाव क्षणात निवळला.
