कदा एका व्यक्तिने आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त त्यास विमान भेट दिले, परंतु ज्या व्यक्तिला ते विमान भेट दिले गेले ती व्यक्ती विमानाबाबत अनभिज्ञ होती. त्याने ते विमान आकाशात न उडवता बैल जोतून त्या विमानाचा वापर बैलगाडीसारखा केला. तसेच आज फुले-आंबेडकरी चळवळीचे झाले आहे. कारण फुले-आंबेडकरी चळवळ विमानासारखीच विचाराने आकाशात झेप घेणारी आहे. परंतु जे कुणी फुले-आंबेडकरांचे नाव घेवून कार्य करतात ते ती चळवळ समजून न घेतांच आंधळेपणाने कार्य करीत अस्तित्वात असलेल्या मूल्यहिन व्यवस्थेचीच जोपासना करीत असतात.
फुले-आंबेडकरी चळवळीची काही वैशिष्ट्ये आहेत. ही चळवळ आत्मसन्मानाची असून स्वबळावर चालणारी आहे. या चळवळीची व्याप्ती केवळ देशच नव्हे तर संपूर्ण विश्व असून तिला एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. तो म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुत्त्व व न्याय. यालाच आपण मानवी मुल्यांचा सिद्धांत असे म्हणतो. या सिद्धांतानुसार येथील प्रस्तापित उच्च-निचतेची व्यवस्था बदलून येथे समतेवर आधारीत समाज व्यवस्था निर्माण करणे हा चळवळीचा उद्देश आहे; आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी त्याचा एक निश्चित मार्ग आहे. त्या मार्गाचा निर्देष राष्ट्रपिता जोतीराव फुल्यांनी केलेला आहे. त्यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘शेठजी-भटजी विरुद्ध शुद्र-अतिशुद्रांचा संघर्ष’. अर्थात त्यांनी आपले मित्र कोण व शत्रू कोण याची बहुजन समाजाला ओळख करून दिली आहे. त्यामुळे असे म्हणता येईल की, देशात प्रस्थापित असलेली उच्च-निचतेची व्यवस्था उध्वस्त करण्यासाठी शुद्र-अतिशुद्रांनी (अनुसूचीत जाती, जमाती, मराठा, इतर मागास वर्ग व अल्पसंख्यांक) समता, स्वातंत्र्य, बंधुत्त्व व न्याय या जीवन मूल्यांवर एकत्र येवून जोपर्यंत समता मूलक व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू ठेवणे म्हणजे फुले-आंबेडकरी चळवळ होय. जसे डॉक्टर किंवा वकील होण्यासाठी एक विशिष्ठ अशी पात्रता लागते, त्याचप्रकारे फुले-आंबेडकरी चळवळ चालविण्यासाठी विशेष अशी पात्रता लागते. त्यात बुद्धीमत्ता, चारित्र्य, कर्तृत्व व निष्ठा ह्या गोष्टी आवश्यक आहेत. बुद्धीमान माणूस हा इतरांसारखे सामान्य जीवन जगत नसतो. तो आपल्या कर्तृत्वाने, निष्ठेने मानवी कल्याणाच्या मार्गाचा शोध घेवून त्यावर वाटचाल करीत असतो. फुले-आंबेडकरी चळवळ ही केवळ शिक्षण व नोकरी प्राप्त करून पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नव्हे, तर शिक्षणातून व नोकरीतून मिळणाऱ्या साधनांचा वापर सन्मान प्राप्त करण्यासाठी उपयोगात आणायचा आहे. बाबासाहेब डॉ.भीमराव रामजी आंबेडकर म्हणतात की, “तरुणांनी नेहमी आपल्यापुढे उदात्त ध्येय ठेवले पाहीजे. मनुष्याने आपल्या आयुष्यात खाणेपिणे व जगणे ही आयुष्यातील इतिकर्तव्यता मानता कामा नये. खाणे-पिणे हे जगण्याकरिता असावे व जगणे हे मानमरतबाचे व समाजास भूषणभूत होण्यासाठी समाजसेवेचे असावे. खाण्याला काळ व भूईला भार असे जीवन असले काय नि नसले काय सारखेच. याबाबतीत प्रसिद्ध नाटककार कै. गडकरी यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, “जोपर्यंत समाज आपली मानमान्यता ठेवतो तोपर्यंत जगण्यात भूषण आहे. नाहीतर समाजास अप्रिय होऊन अगदी म्हातारा होवून बिछान्यास खिळून अगर घरातील सुनामुलांच्या तिरस्कारास पात्र होऊन झिजून झिजून जगण्यापेक्षा त्या अगोदर आलेले मरण भूषणाचे असते.
आपल्या जीवनाचा समाजाशी अतूट असा संबंध आहे. याचा अर्थ माणसाचा दर्जा त्याच्या समाजावर अवलंबून असतो व समाजाचा दर्जा उंचावणे हे प्रत्येक व्यक्तिवर अवलंबून असते. परंतु आपणास हे कार्य वैयक्तिकरित्या किंवा एकट्याने करता येणार नाही. ज्याअर्थी समाजाच्या मोठेपणावर आपले मोठेपण अवलंबून असते, त्याअर्थी समाज मोठा कसा होईल हे ध्येय प्रत्येकासमोर असले पाहीजे. यासंबंधात बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणतात, “एखादी मुलगी नर्स झाली की ती आपल्या धंद्यात डोके घालते व आपल्यापुरतेच पाहते. कोणी मास्तर झाला की तो आपल्या मास्तरकीत दंग होतो व सार्वजनिक कामात पडत नाही. कोणी कारकून किंवा कोणत्याही हुद्यावर असला तरी तो आपल्या व्यापात असतो व सामाजिक अन्यायाकडे दुर्लक्षच करतो.
जेव्हा आपल्यासमोर सामाजिक उन्नतीचा प्रश्न असतो तेव्हा वैयक्तिरित्या कुणाला शाळा-कॉलेजात प्रवेश मिळवून देणे किंवा कुणाला एखादा ट्रेड किंवा नोकरी मिळवून देणे हा उद्देश नसतो. तर समाजाची विशिष्ट अशा मूल्यांच्या आधारावर बांधणी करून निकोप समाज घडविणे असा असतो व असायला हवा. परंतु प्रत्येक जण आज काही ठराविक लोकासाठी काम करू इच्छितो. त्यात मग इतरांना शिक्षणात मदत करणे, रोजगार मिळवून देण्यात मदत करणे किंवा आर्थिकदृष्ट्या मदत करणे, इत्यादी. परंतु ज्या विचाराच्या आधारे समाज घडविला जावू शकतो, समाजाचे मोठेपण वाढविल्या जाऊ शकते, तो विचार मात्र आपण लोकांना देत नाही. आणि इथेच चळवळ संपते. आपण जर मागे वळून बघितले तर असे दिसते की, राष्ट्रपिता जोतिबा फुले किंवा बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांनी विचाराशिवाय कुणाला काही दिले नाही. आणि ज्यांनी त्यांचा विचार घेतला व आत्मसात केला त्यांना जीवनाचे सार समजले. जीवनाचे सार समजणे हेच फुले-आंबेडकरी चळवळीचे सार होय. समाजाच्या अशा वैचारिक बांधनीतूनच
सर्वांना शिक्षण प्राप्त होवू शकते, नोकऱ्या मिळू शकतात, उद्योगधंदे निर्माण केले जावू शकतात, साहित्य, कला व क्रिडा निर्माण होवू शकते. हा एक वैचारीक आधारावर निर्माण झालेल्या संघशक्तीचा परिणाम आहे. परंतु त्यालाच आपण साध्य समजण्याची चूक करीत असतो. आपण नेमके उलट्या पद्धतीने कार्य करतो. संघशक्ती निर्माण न करता मुलांना अगोदर शिक्षण, नोकरी मिळाली पाहीजे, आर्थिक परिस्थिती सुधारली पाहीजे, असा सुट सुटा विचार करीत असतो. असा विचार हा स्वार्थी व मतलबाचा विचार असतो. कारण असे केल्याने वरील गोष्टी प्राप्त तर होत नाहीच, परंतु त्या मिळविण्यासाठी माणूस कुठल्याही मार्गाचा अवलंब करतो, कुठल्याही विचाराचा अवलंब करतो आणि स्वतःच्या फायद्यासाठी समाजाचा घात करतो. अशाने समाज खिळखिळा होतो. समाजाचा मग कुणावर अंकुश उरत नाही. त्यामुळे लोक मन मानेल तसे वागतात. समाजाचे धरबंधन नसल्यामुळे लोक शत्रू पक्षाचे काम करायलाही मागेपुढे पहात नाहीत. केवळ पैशाच्या लालसेपोटी आपल्या शत्रूपक्षाच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करतात आणि आपल्या अधोगतीस कारणीभूत ठरतात. अशा कार्याच्या माध्यमातून आपल्या जीवन मूल्याचा हास होतो आणि त्यातून प्रतिक्रान्तीचा जन्म होतो. म्हणून फुले-आंबेडकरी चळवळीत वैचारिक मूल्य महत्त्वाचे असून त्या आधारावर समाजाची बांधणी त्यापेक्षा महत्त्वाची आहे. अन्यथा त्या मानवी मुल्यांच्या विचारांना काही अर्थ उरत नाही. त्यासाठी ती मूल्ये समाजात रूजली गेली पाहीजे. त्यासाठी तो विचार, ती मूल्ये घरोघरी जावून सांगणे महत्त्वाचे आहे. त्यापेक्षा महत्त्वाचे आहे ती मूल्ये सांगणाऱ्यांचा आचार ती मूल्येच जर तुमच्या आचरणात नसतील तर त्या मूल्यांचा पुरस्कार तुम्ही कसे करू शकता ? आज समाज म्हणून असे काही शिल्लकच नाही. समाज म्हणजे केवळ जातीची किंवा धर्माची लोक नव्हेत, तर काही विशिष्ठ हेतूने, काही विशिष्ठ मूल्यांवर एकत्र आलेली लोक म्हणजे समाज. अशा समाजात स्वाभिमान निर्माण करणे महत्त्वाचे आहे. स्वाभिमानाविषयी बोलताना बाबासाहेब डॉ.भीमराव रामजी आंबेडकर म्हणतात की, “आपणास स्वाभिमानाची अत्यंत जरूरी आहे. स्वाभिमान सोडून साधलेली उन्नती ही कुचकामाची आहे. इतरांप्रमाणे आपणही माणसे आहोत ही गोष्ट प्रत्येक तरुणाने आपल्या मनात वागविली पाहिजे. आपण लोकांनी आपल्या अंगी निर्भयता बाणविली पाहिजे. आपल्या समाजास मानासन्मानाने जगात राहावयाचे असल्यास आपण सदैव मरावयास तयार असले पाहिजे. अशी आपली वृत्ती झाली की आपला अपमान करण्यास कोणीही धजणार नाही. ‘निर्भय व्हा व जगाचे राज्य मिळवा’ हेच माझे बहुजन समाजास व तरुणास सांगणे आहे.