दादर रेल्वे स्थानकामध्ये मर्यादित प्रवेश
मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी लाखो अनुयायी चैत्यभूमीला भेट देण्यासाठी मुंबईत येणार असल्याने मध्य रेल्वेने विशेष उपाययोजना आखल्या आहेत. गर्दीमुळे गैरसोय होऊ नये, यासाठी ४ डिसेंबर ते ८ डिसेंबरदरम्यान १६ विशेष मेल/एक्स्प्रेस गाड्या आणि ५-६ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालयाने ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ६ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत दादर स्थानकात मर्यादित प्रवेश लागू केला आहे.
मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या भाविकांची गर्दी सुरळीत करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. या वेळी येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण येथे तिकीट तपासणी कर्मचारी, आरपीएफ आणि जीआरपी यांच्याद्वारे २४ तास हेल्प डेस्क सुरू करण्यात आले आहेत. दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण येथे अतिरिक्त यूटीएस काउंटर उघडण्यात आले आहेत.
हेल्प डेस्क आणि तिकीट काउंटर
दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि कल्याण येथे २४ तास चालणारे हेल्प डेस्क सुरू करण्यात आले आहेत. अनारक्षित तिकिटांसाठी आणि चौकशीसाठी चैत्यभूमीजवळ दोन यूटीएस काउंटर उघडण्यात आले आहेत.
गर्दी व्यवस्थापन
दादर येथे स्वतंत्र प्रवेश व निर्गमन व्यवस्था तसेच मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत. ‘चैत्यभूमीकडे जाण्याचा मार्ग’ आणि ‘राजगृहाकडे जाण्याचा मार्ग’ असे २१४ बॅनर दादर स्थानकावर लावण्यात आले आहेत.
पोलिसांचा मोठा फौजफाटा
गर्दी व्यवस्थापनासाठी ६७५ तिकीट तपासणी कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणावर रेल्वे पोलिस तैनात करण्यात आले आहेत. आरपीएफचे कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये काम करतील, तर दादर येथे २५० हून अधिक जीआरपी कर्मचारी तैनात असतील. दादर येथे १२०, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ४० आणि कल्याण येथे ३० कर्मचारी नियमित तैनात करण्यात आले आहेत. अतिरिक्त सुरक्षा उपाय म्हणून दादर येथे २५० हून अधिक जीआरपी आणि ८० हून अधिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तैनात करण्यात आले आहेत.
भोजनाची व्यवस्था
प्रवाशांसाठी पुरेशी भोजन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानक पूर्व-पश्चिम जोडणारा मध्य मोठा पूल – मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील पूर्व-पश्चिम जोडणारा मध्यभागी स्थित मोठा पूल व फलाट क्रमांक १२ वरील सर्व प्रवेशद्वार शहर हद्दीतून रेल्वे स्थानकात येणाऱ्या अनुयायी व प्रवाशांकरिता बंद असेल. – रेल्वे प्रवाशांना स्थानकाबाहेर जाण्यासाठी आणि मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्याकरिता खुला राहील.
000
