केतन खेडेकर
मुंबई : मला मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराबद्दल खूप श्रध्दा असून सात्विक अनुभव आहे. तसा मी आस्तिक आहे. असे उद्गार डॉ. अनिल काकोडकर यांनी काढले.
महालक्ष्मी मंदिरामध्ये “श्री महालक्ष्मी नमोस्तुते” या कॉपी टेबल पुस्तकाचे अनावरण झाले त्यावेळी बोलताना डॉ. काकोडकर म्हणाले आई आणि मी मुंबईत आलो तेव्हा परिस्थिती हलाखीची होती. शिकण्यासाठी मुंबई गाठली. राहता येईल की नाही अशी दोलायमान परिस्थिती निर्माण झाली. माझ्या आईने महालक्ष्मीला नवस केला की, गौरी गणपती दरम्यान देवीची ओटी भरण्यास येईन, १९५६ सालापासून आजतागायत जवळजवळ ६७ वर्षे महालक्ष्मीला येतो (कोरोनाचा काळ सोडला), पूर्वी पाठीमाने खडकांवर बसून लाटांच्या सान्निध्यात मूग भजी खात असे, पण आता कोस्टल रोड झाल्यामुळे ती मजा नाही. महालक्ष्मीच्या दर्शनाला येणा-या भाविकांची संख्या प्रचंड आहे.
कालनिर्णयकार जयंत साळगावकर म्हणाले डॉ. काकोडकर यांची मिसाईल बनविण्यात खूप ताकद आहे. या तिन्ही देर्वीच्या मूर्त्यांमध्ये सरस्वती महत्वाची असून कालिका संहार करते तर लक्ष्मी पैसे देते, नमस्कार केला की प्रेरणा मिळते. मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष विजय गुपचूप म्हणाले डॉ. काकोडकरांना बघून आनंद मिळतो. काकोडकरांचे जीवन सामान्य माणसाला समर्पित आहे हिच त्यांची ओळख आहे.
कार्यकारी विश्वस्त-चार्टड अकांउटंट शेखर दांडेकर म्हणाले या पुस्तकामुळे भक्तांना प्रेरणा मिळेल हे मोठे शिवधनुष्य आहे ते पेलण्याचे काम घैसास यांनी उत्कृष्ट केलेले आहे. प्रत्येकाची वेळ सारखीच असते पण घैसास यांनी त्याचा योग्य उपयोग केलेला आहे. व्यवस्थापक नितीन कांबळी यांनी आभार प्रदर्शनानंतर प्रत्येक भाविकाला विनामूल्य पुस्तकाची प्रत देऊन त्यांचे मनापासून आभार मानले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे, शिवसेना विभाग प्रमुख अशीश चेंबूरकर, प्रकाश राऊत, उदय लाड, ज्येष्ठ पत्रकार प्रविण मंत्री, चित्रा वैद्य आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.
000