मुंबई बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत बुधवारी पहाटे काही भागात हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान, मुंबईच्या किमान तापमानात अवघ्या तीन दिवसांत ७.७ अंशानी वाढ झाली आहे. तसेच कमाल तापमानाचा पारादेखील बुधवारी चढाच होता.

बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतील वातावरणावरही झाला आहे. मागील दोन – तीन दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबईसाठी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवलेली नाही. मात्र, बुधवारी पहाटे दादर, वांद्रे, सांताक्रूझ आणि पवई परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी २५.८ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २५.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. अवघ्या तीन दिवसांत मुंबईच्या किमान तापमानात ७.७ अंशानी वाढ झाली आहे. तसेच सरासरीपेक्षा किमान तापमान बुधवारी ५.५ अंशानी अधिक नोंदले गेले. तसेच कमाल तापमानाचा पारादेखील बुधवारी चढाच होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३७.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. वातावरण ढगाळ झाल्याने आर्द्रतेत वाढ होऊन उकाडा सहन करावा लागत आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस कमाल तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यत्त केला आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वी थंडीची चाहुल लागली होती. दरम्यान, डिसेंबर महिन्यात देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *