नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हिंसाचारग्रस्त संभलला भेट देण्यासाठी निघालेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वधेरा यांच्यासह काँग्रेस नेत्यांना दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवरील गाझीपूर सीमेवर पोलिसांनी रोखले. त्यांना संभलला जाण्यासाठी मनाई करण्यात आली. गाझीपूर सीमेवर बुधवारी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संबलच्या सीमेवर अडवल्यावर तेथेच हातात संविधानाची प्रत घेऊन राहुल गांधी यांनी पत्रकरांना संबोधित केले.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हिंसाचारग्रस्त संभल भागाचा दौरा करणार होते. ते तेथील नागरिकांशी संवाद साधणार होते. पण प्रशासनाने त्यांना तेथे जाण्यावर बंदी घातली आहे.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उत्तर प्रदेशातील संभलच्या दिशेने जात असल्याने शहर, जवळपासच्या भागात आणि दिल्लीपासून त्यांच्या मार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यांना येथे जाण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. ते सकाळी १०.१५ च्या सुमारास दिल्लीहून निघाले. ते दुपारी १ वाजता संभलला पोहोचण्याच्या तयारीने निघाले होते. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशातील काँग्रेस खासदारांचा एक गटदेखील होता. काँग्रेस नेत्यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यापासून थांबवावे, अशा सूचना संभल प्रशासनाने शेजारील जिल्ह्यांना केली होती. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी बुलंदशहर, अमरोहा, गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगर येथील अधिकाऱ्यांना पत्र लिहून सीमेवर राहुल गांधी यांना थांबवण्याचे आवाहन केले.
