नवी मुंबई महानगरपालिकेची संविधान साक्षरतेच्या दिशेने नियोजनबध्द वाटचाल

नवी मुंबई : भारताचे संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर आपल्या जीवनशैलीचे मार्गदर्शक आहे अशा शब्दात संविधानाचे महत्व विशद करीत माजी मुख्य आयुक्त श्री. जे.एस.सहारिया यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा थेट जनतेशी संबंध असल्याने महानगरपालिकेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्याला समाजासाठी उपयोगी पडण्याची ही उत्तम संधी असल्याचे जाणून काम करावे असे सांगितले. यादृष्टीने संविधानातील मूल्यांचा आपल्या कामकाजात कसा उपयोग होईल व यातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व समाजातील शेवटच्या माणसाला कशी मदत होईल याचे भान राखून काम करायला हवे असे ते म्हणाले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अमृत महोत्सवी संविधान पर्वानिमित्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आयोजित संविधान परिचय कार्यशाळेमध्ये ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकातील सभागृहामध्ये संपन्न झालेल्या ‘संविधान परिचय कार्यशाळे’प्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे सहआयुक्त श्री. समीर उन्हाळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे तसेच कार्यशाळेतील व्याख्यात्या कॉमनवेल्थ लोकल गव्हर्मेंट फोरम आशियाच्या प्रादेशिक कार्यक्रम व्यवस्थापक श्रीम. अनुया कुंवर, संविधान अभ्यासक लेखक श्री. सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना  कॉमनवेल्थ लोकल गव्हर्मेंट फोरम आशियाच्या प्रादेशिक कार्यक्रम व्यवस्थापक श्रीम.अनुया कुंवर यांनी संविधानाचे महत्व जाणून त्याची महती जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करणारी पहिली महानगरपालिका म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचा गौरव केला. कॉमनवेल्थ लोकल गव्हर्मेंट फोरमच्या वतीने सुशासनासाठी करण्यात येणाऱ्या धोरणांची माहिती देत त्यांनी अबार्डिन अजेंडानुसार सुशासनासाठी प्रमाण मानके म्हणून निश्चित केलेल्या 12 तत्वांचे विवेचन केले. संविधानाने सांगितलेल्या मूल्यांचा आपण दैनंदिन कामकाजात वापर करीत आहोत काय? असा प्रश्न स्वत:लाच विचारून प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने आत्मचिंतन केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
संविधानाचे अभ्यासक श्री.सुरेश सावंत यांनी हे ज्ञानस्मारक म्हणजे प्रेरणास्थान असून याठिकाणी आल्यानंतर समृध्द झाल्यासारखे वाटते असे सांगत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नवी मुंबई संविधान साक्षर मोहीम’ राबविण्याचे सुव्यवस्थित नियोजन केल्याबद्दल प्रशंसा केली. ही मोहीम राबविताना पहिल्या टप्प्यात संविधान परिचय वर्ग आयोजन व दुसऱ्या टप्प्यात घर घर संविधान साक्षर मोहीम राबविली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या नियोजित मोहीमेचा आराखडा सादरीकरणाव्दारे मांडत त्यांनी संविधान समजणे ही साक्षरतेची पहिली पायरी असल्याचे सांगितले व संविधानाची उद्देशिका हे तिचे सार असून उद्देशिकेतील मूल्यांचा अर्थ उलगडून सांगितला.
नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी समारोप करताना कार्यशाळेत विचारमंथन झालेल्या विविध मुद्दयांचा परामर्श घेतला. संविधानाने ज्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार दिले आहेत तशीच काही कर्तव्यदेखील सांगितली आहेत, त्यादृष्टीने लोकजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. मनुष्याचा विकास व्हावा हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून काम करताना ‘मी इथे का आहे?’ असा प्रश्न प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी स्वत:ला विचारला पाहिजे व आपल्याला जनतेसाठी काम करण्याची मोठी संधी महानगरपालिकेचा कर्मचारी म्हणून मिळाली याची जाणीव ठेवावी असे ते म्हणाले. आपल्या अधिकारांचा वापर शिक्षा करण्यासाठी नाही तर माणसाचे जीवन आनंदी करण्यासाठी आहे याचे भान राखून काम करावे असे मत यावेळी आयुक्तांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेने आधुनिक काळाला साजेशी संगणकीय ऑनलाईन कार्यप्रणाली अंगिकृत करीत नागरिकांसाठी ग्रिव्हेन्स रिड्रेसल सिस्टीम, माय एनएनएमसी ॲप विकसीत केले असून नागरिकांच्या तक्रारी सोडवणुकीसाठी नियोजनबध्द कार्यप्रणाली आत्मसात केली आहे तसेच थेट संवादी दृष्टीकोन ठेवला आहे असेही आयुक्तांनी सांगितले. व्याख्यात्यांनी मांडलेल्या बाबींवर सविस्तर भाष्य करताना समाजातील सर्व घटकांपर्यंत संविधान साक्षरता मोहीम पोहोचविण्यासाठी ठोस नियोजन केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात ज्ञानकेंद्र म्हणून नावाजल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील उल्लेखनीय सुविधांची व नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देत संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान परिचय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यापुढील काळात शासनाने निर्देशित केल्यानुसार ‘घर घर संविधान’ अभियान व्यापक स्वरुपात राबविले जाणार असून त्याचा प्रारंभ या संविधान परिचय कार्यशाळेने झाला.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *