बाळा नांदगावकर, राजू पाटील शर्यतीत
स्वाती घोसाळकर
मुंबई: महाराष्ट्राच्या सत्ताकारणात बेरेजेचे राजकारण करण्यावर आपला भर राहील असे सुतोवाच करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या महायुतीच्या सत्तेत आता मनसेही वाटेकरी होणार आहे. मंतिमंडळाच्या पहिल्या यादीत मनसेच्या वाटेला एक मंत्रिपद येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार राज ठाकरेंचे निष्ठावान आणि अत्यंत विश्वासू मानले जाणाऱ्या बाळा नांदगावकर यांच्यासह कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांचे नावही यासाठी शर्यतीत आहे. आगामी महापालिकेच्या दृष्टीने ही व्यव्हरचना आखली जातेय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मनसेच्या जवळकीबाबत सुतोवाच केल्याने या वृत्तास पृष्ठी मिळाली आहे. राज ठाकरे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणात जुळतात. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आनंद आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जिथं शक्य आहे, तिथं त्यांच्यासोबत एकत्र येण्याचा आम्ही विचार करु असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवड़णुकीत आम्हाला खुल्या दिलानं पाठिंबा दिला होता. त्याचा आम्हाला फायदादेखील झाल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पण विधानसभेला त्यांच्यासमोर देखील प्रश्न होता. त्यांचा महाराष्ट्रात वेगळा पक्ष आहे. त्यांच्या लोकांनी निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा? आमच्याकडे राज ठाकरे यांना देण्यास जागा नव्हत्या. कारण आम्ही तीन पक्ष होतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ही सगळी वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस म्हणाले.
महापालिकेच्या निवडणुकीत जिथं शक्य तिथं राज ठाकरेंना सोबत घेऊ
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे प्रवाहाच्या विरोधात लढून देखील त्यांना चांगली मते मिळाल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांच्या अनेक उमेदवारांनी चांगली मते मिळाली आहेत.
सरकार कुणाचेही येऊदे मनसे सत्तेत सहभागी होणार असा शब्द विधानसभा निवडणूकीपुर्वी राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना दिला होता. देवेंद्र फडणवीसांच्या आजच्या वक्तव्यामुळे राज ठाकरेंचा सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झालाय. यंदाच्या विधानसभेत राज ठाकरेंच्या मनसेने १३५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यापैकी एकही उमेदवार विधानसभेची निवडणूक जिंकू शकला नव्हता. गेल्या विधानसभेत राज ठाकरेंचा राजू पाटील हा एकमेव उमेदवार जिंकून आला होता. त्यामुळा बाळा नांदगावकरांसोबत राजू पाटील यांचे नावही मंत्रीपदासाठी चर्चेत आहे. महापालिकेच्या दृष्टीने बाळा नांदगावकर यांचा समावेश मंत्रिमंडाळात समावेश होऊ शकतो. किंवा ठाणे जिल्ह्यातील एकनाथ शिंदेंच्या वर्चस्वाला ब्रेक देण्यासाठी राजू पाटील यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो असेही सुत्रांने सांगितले.