ठाणे : महिलांचा आर्थिक विकास साध्य करण्याकरिता महिला बचत गटातील उद्योजक महिलांना बाजारपेठ उपलब्ध करण्याकरिता यशस्विनी हे ई कॉमर्स पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून उद्योजक महिलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील महिला बचतगटातील उद्योजकांनी या पोर्टलवर नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
मिशन शक्ती हा केंद्र शासनाचा देशभरातील महिलांच्या स्थानांचा सर्वंकष कार्यक्रम आहे. महिला सक्षमीकरण केंद्र (Hub For Empowerment of Women) या कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांच्या कल्याणकारी योजना या एका छताखाली मिळाव्यात यासाठी महिला सक्षमीकरण केंद्र ही संकल्पना प्रस्तावित केली असून त्या अनुषंगाने या कार्यक्रमाअंतर्गत महिलांचा आर्थिक विकास साध्य करण्याकरिता महिला बचत गटातील उद्योजक महिलांना बाजारपेठ उपलब्ध करण्याकरिता यशस्विनी पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून उद्योजक महिलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. घर बसल्या उद्योजक महिलांनी तयार केलेल्या वस्तू विकल्या जातील व त्याचा मोबदला सबंधित महिलेच्या बँक खात्यावर जमा होईल.
यासाठी उद्योजक महिलेने यशस्विनी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. पोर्टलवर नोंदणी करण्याकरिता पुढीलप्रमाणे कागदपत्रे लागणार आहेत. १) आधार कार्ड, २) पैन कार्ड, ३) बैंक पासबुक, ४) इमेल आयडी, ५) मोबाईल नंबर (ओटीपी) करिता.
ठाणे जिल्ह्यातील महिला बचत गटातील उद्योजक महिलांनी अधिक माहितीसाठी दिपक जिवलगे (९१४८०१५८१९) यांच्याशी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून यशस्विनी पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *