ठाणे : मानपाडा, मनोरमा नगर व आझाद नगर येथील रहिवाशांसोबत नुकतीच क्लस्टरबाबत सभा संपन्न झाली. शहरातील बहुमजली इमारती व झोपडपट्टया इत्यादींचा एकत्रित विकास साध्य होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने समूह विकास योजना राबविणारी ठाणे महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची अमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून सर्व संबंधितांपर्यंत ही योजना पोहोचावी यासाठी नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे. याच अंतर्गत, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी क्लस्टर सेल कार्यालयात मानपाडा, मनोरमा नगर व आझाद नगर येथील नागरीकांना योजनेची संपूर्ण माहिती देऊन त्याबद्दल मार्गदर्शन केले. बैठकीस उपस्थित नागरिकांच्या तसेच एकता संघ गाव बचाव कृती समितीचे पदाधिकारी यांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यात आले. योजनेच्या संकल्पनेबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच, योजनेत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
या बैठकीस उपायुक्त डॉ. पद्मश्री बैनाडे, सहाय्यक आयुक्त श्री. भालचंद्र घुगे, कार्यकारी अभियंता महेश रावळ, नगर रचनाकार किरण माळगांवकर, उप अभियंता रमेश इनामदार आदी उपस्थित होते.
00000