ठाणे : समाज कल्याण विभागांतर्गत ठाणे जिल्ह्यातील २६ दिव्यांग शाळांमध्ये जागतिक दिव्यांग दिनानित्तम ३ डिसेंबर ते १० डिसेंबरपर्यंत दिव्यांग दिन सप्ताह राबवण्यात येत आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे यांच्या मार्गदर्शनाने दिव्यांग दिन सप्ताह अंतर्गत १ हजार ७५० विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम शाळास्तरावर यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत.
दिव्यांगांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने दिव्यांगांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. विविध क्रिडा स्पर्धा, रांगोळी, भरतकाम, चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धां तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोजगार व स्वंयरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री इ. कार्यक्रम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी राबवण्यात येत आहे. दिव्यांगांच्या विशेष शाळा/ कार्यशाळांमध्ये पालक शिक्षक बैठक आयोजित करून पालकांना भविष्यात दिव्यांग मुले जन्माला येऊ नयेत या दृष्टीने दिव्यांगत्व प्रतिबंधात्मक उपाय व मार्गदर्शन, दिव्यांग बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी समुपदेशन, दिव्यांग बालकांना समावेशित शिक्षण, दिव्यांगांचे त्वरित निदान तसेच उपचार याबाबत मार्गदर्शन इ. कार्यक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत आहेत. जिल्हास्तरावर दिव्यांग अधिकार अधिनियम २०१६ तसेच दिव्यांगांसाठी असणारे इतर कायदे व दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना व सवलतीबाबत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून दिव्यांग विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या मार्फत प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच दिव्यांग शाळांमध्ये दिव्यांग अधिकार अधिनियम २०१६ चे वाचन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत. शाळेत विविध आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये जिल्हयातील शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब इ. सारख्या सामाजिक संघटनांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
00000