बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील हजारो मान्यवरांची लाभली उपस्थिती
पनवेल : रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, तसेच राज्यातील विविध भागात शास्त्रीय संगीत आणि भजन संगीतचा प्रचार व प्रसार करत सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात आपले आयुष्य वेचणारे ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रम संस्थेच्यावतीने सहस्रचंद्र सोहळा समारंभपूर्वक संपन्न झाला. विशेषत्वाने बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा हृद्य सोहळा पार पडला.
धार्मिक आणि सामाजिक समारंभ असलेल्या या सोहळ्यात ह .भ.प. निवृत्तीबुवा चौधरी यांचे पूजन करण्यात आले. त्यांनतर जवळपास ५० किलो पैशाची नाणी, मिठाई आणि सुकामेवा या साहित्यातून तुला करण्यात आली. विशेष म्हणजे बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या मातोश्री पार्वती यांचा सहा वर्षांपूर्वी सहस्रचंद्र सोहळा झाला होता. त्यानंतर हा सन्मान निवृत्तीबुवा चौधरी यांना मिळाला. त्यामुळे निवृत्तीबुवा चौधरी यांच्या रूपाने भजन परंपरेचा अलौकिक सत्कार या निमिताने झाला.
ठाणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणेशपुरी येथे झालेल्या या सोहळ्याला सामाजिक, शैक्षणिक, आध्यत्मिक, सांस्कृतिक, कला अशा विविध क्षेत्रातील मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. मूळचे पनवेल तालुक्यातील रांजणपाडा येथील नादब्रम्ह साधना मंडळाचे संस्थापक तथा विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांनी आपल्या अध्यात्मिक वाणीतून हजारो शिष्य घडविले. संगीत क्षेत्राच्या उत्थानासाठी त्यांनी ६० वर्षापेक्षा जास्त काळ अविरतपणे काम केले आहे. आजही त्यांचे हे कार्य पुढे सुरूच आहे. त्यांच्या शिकवणीतून तयार झालेले शिष्यांचीही या क्षेत्रात नाव उज्वल केले आहे. ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचे कार्य समाजाला नेहमी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरले आहे. त्या अनुषंगाने त्यांचा बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या देखरेखीत हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंददायी भावनेतून संपन्न झाला.
दरम्यान या सोहळ्यात निवृत्तीबुवा चौधरी यांचे सुश्राव्य भजनही झाले. त्यानंतर रायगड भूषण पं. उमेश चौधरी, शिवमाला पाटील, श्रुती पाटील यांचे अभंग गायन झाले. त्यांना नादब्रम्ह साधना परिवाराने साथ दिली.