जसे दुभंगलेले घर संकटांना सामोरे जावू शकत नाही तशीच अवस्था आज आंबेडकरी समाजाची झालेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा एकेकाळी अग्रदूत राहिलेला हा समाज देशातील एकूणच दलित शोषित समाजाचे पुढारपण करणारा होता. आज हा समाज बऱ्यापैकी शिकला सवरला आहे. बऱ्याच अंशी नोकरी चाकरीला आहे. छान पैकी पैसाही खुळखुळायला लागला आहे. वरिष्ठ अधिकारी वर्गातही या समाजाचे लोक लक्षणीय संख्येत आहेत. अगदी गांव पातळीवरच्या पुढाऱ्यांकडेही गाड्या घोड्या आलेल्या आहेत. बाबासाहेबांच्या आंदोलनाच्या प्रारंभकाळी अशी ऐहिक समृध्दि या समाजाकडे नव्हती. खुप गरीब आणि कंगाल लोकांनी बाबासाहेबांची चळवळ रक्ताचे पाणी करुन उभारली. बाबासाहेबांचे कालचे लोक खुप गरीब होते आणि त्यांची चळवळ मात्र प्रचंड श्रीमंत होती. आज भौतिक सुखांची श्रीमंती आली आहे आणि चळवळ मात्र पार लयाला गेलेली आहे. राजकारण, समाजकारण, धम्मकारण, कला, साहित्य या सर्व बाबतीत चळवळ दिवसेंदिवस भंगत चालली आहे. शहरांत जशी ती भंगली आहे तशी खेड्यातही ती भंगली आहे. राजकारणात ती शतखंडीत झाली आहे. धम्मकारणात तिच्या चिरफळ्या उडाल्या आहेत. सामाजिक संघटनांचे तुकडे तुकडे झाले आहेत. अंगभूत प्रतिकाराची शक्तीच हा समाज हरवून बसला आहे. जसा या समाजातील कष्टकरी समुह भंगलेला आहे तसाच कथाकथित बुध्दिवादी वर्ग विखुरलेला आणि संघटनहीन आहे. साहित्यिक विस्कटले आहेत. कलावंत फिसकटले आहेत. एका विलयाच्या अवस्थेपर्यंत आंबेडकरी चळवळीचा ऱ्हासाचा प्रवास सुरु झाला आहे. आंबेडकरी समुदायाची एकही वस्ती आता संघटीत राहिलेली नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्यांची आरास मांडली जातेय. बुध्द जयंत्याही होताहेत. दीक्षाभूमिवर जनसागराला तुफान येतेय. चैत्यभूमिवरील गदीं वाढतच चालली आहे. पण आंबेडकरी चळवळ त्यात कुठे दिसत नाही. राजकीय दृष्ट्या हा समाज भुईसपाट होत चालला आहे. गल्लो गल्ली पुढाऱ्यांची पैदास बेसुमार झाली आहे पण समाजाला दिशा देणाऱ्या प्रभावी नेतृत्वाचे अस्तित्वच संपत चालले आहे. ज्यांना फुले- आंबेडकरी विचार माहित नाही, ज्यांना आंबेडकरी चळवळीचा संघर्षशील इतिहास ठाऊक नाही, जो कधी अत्याचारा विरुध्दच्या संघर्षाच्या जमीनी लढाईत उतरला नाही असा लंपन, चमकेश, संधीसाधु, समझौतापरस्त, विकावू वर्ग पुढारपणात पुढे आला आहे. असा संधीसाधु बदमाश वर्ग त्याहीपेक्षा जास्त घाऊक विकाऊ गटबाज नेत्यांच्या टोळ्यांचा साथीदार झालेला आहे. या वर्गाने आंबेडकरी विचारांशी केव्हाच फारकत घेतलेली आहे. जागोजागी नाक्या नाक्यांवर मोठमोठाली होर्डिंग्ज लागत आहेत. बाबासाहेब आंबेडकर आणि मनुवादी विचारधारेला मजबूत करणारे भाडखावू नेते एकाच मापात होर्डिंग्जवर झळकताहेत. धर्मलंडर लोफर पोस्टर्सवर बाबासाहेबांच्या बरोबरीने चित्रांत झळकताहेत. तेही आंबेडकरी चळवळीच्या राजधानीत मनुवादी विचारधारेला मानणारे यांची आणि बाबासाहेबांची एकत्रित पोस्टर्स काढली जाताहेत. आंबेडकरी समाजाची सदसद्विवेकबुध्दि विकली गेली आहे. चळवळ सर्वनाशाच्या गर्तेत कोसळत आहे आणि शिल्लक राहिले आहेत फक्त भाडखावू
गटबाज आणि त्यांच्या तोंडपुज्या टोळ्या! समाजातील आटासकट,नकट्या, अर्धवट, भंकप अशा टुकार गणंगांकडे नेतृत्वाची धुरा आली
आहे. अशा या अवसानघातकी वातावरणात ज्याच्याकडे आशेने पहावे तो शिक्षित मध्यमवर्ग प्रचंड उदासिन आणि निष्क्रिय आहे व तो स्वयं केंद्रीत झाला आहे. त्याला त्याच्या कुटुंबकोषापलिकडे काहीही पहावयाचे नाही.याच वर्गातून विचारवंत, साहित्यिक, कवी, कलावंत निपजले जावेत अशी माफक अपेक्षा असते. परंतु हा वर्गही आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान हरपून बसला आहे. या प्रसिध्दीलोलूप बोलघेवड्या आणि सुस्थिती असलेल्या वर्गानेच आंबेडकरी चळवळीशी घोर फसवणूक केली आहे आणि बाबासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली आहे. छोट्या छोट्या पदांसाठी, पुरस्कारांसाठी, खोट्या मोठेपणासाठी हा वर्ग इतका असुसलेला असतो की एकवेळ सामाजिक हीताचा बळी देवून हा ‘समरसता’ मंचावरही लोळून येईल व स्वतःच्या स्वार्थपूर्तीसाठी बौध्दिक लाळघोट्या कसरती करील. खरे म्हणजे साऱ्या समाजाचे वैचारिक आणि बौध्दिक पुढारपण या वर्गाने करावयाचे असते पण यांच वर्गात प्रचंड वैचारिक गोंधळ, पराकोटीचा संधीसाधुपणा आणि निष्क्रियता ठासून भरलेली आहे. साहित्यिक मेळावे, सांस्कृतिक़ खेळ मांडून हा स्वतःचा कंड शमवून घेतो व चळवळीचेच काम केल्याच्या खोट्या कैफात धुंद असतो. अशी सुटी सुटी कार्ये करून अशा गौण कार्यालाच चळवळ समजण्याचा उर्मटपणा या वर्गाचे व्यवच्छेदक लक्षण झाला आहे. गांव गल्लीतल्या पुढाऱ्यांचे इतके वारेमाप पीक आलेले आहे की बाबासाहेबांच्या जयंत्या, टुकार गटबाज नेत्यांचे वाढदिवस, दस्तुरखुद्द गलिबोळातील नेत्यांचे वाढदिवस वगैरे निमित्तांनी (छपाईचे तंत्र सुलभ व स्वस्त झाल्याने) सारी चळवळच होर्डिंगमय झाली आहे. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश महारावांचे एक नाटक व त्यातील एक प्रसंग फारच बोलका आहे. त्या नाटकात स्टेजवरच बाबासाहेब आंबेडकर येतात असा प्रसंग आहे. स्टेजवर पोस्टर दाखविणारे दोन तरुण, ब्रश, शिडी, खळीची बादली व पोस्टर्सची वळकटी घेवून येतात तेव्हा बाबासाहेब त्या तरुणांना विचारतात की ‘तुम्ही काय करता?’ तेव्हा ती मुले बाबासाहेबांना सांगतात, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे तिची पोस्टर्स चिटकवतोय. ‘बाबासाहेब म्हणतात, ‘दाखव पोस्टर’ पोरं बाबासाहेबांना ओळखत नाहीत पोस्टर्स दाखवतात. बाबासाहेब पोरांना म्हणतात ‘यात आंबेडकर कुठाय? पोरं म्हणतात ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये बॅक ग्राऊंडला.’ बाबासाहेब विचारतात ‘जयंती आंबेडकरांची आहे मग इतके रंगीत फोटो पोस्टरवर कुणाचे आहेत ?’ पोरं म्हणतात, हे पहा मागं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बाबासाहेब आहेत. हा मोठा कलर फोटो आहे ते आमचे साहेब आहेत. आणि खाली ज्यांची मुंडकी लावलीत ते सर्व कार्यसम्राट आहेत.’
अशाच गल्लीबोळातील सौदेबाज कार्यसम्राटांची गर्दी वस्तीवस्तीत झाली आहे आणि आंबेडकरी चळवळीचा वैचारिक लढा साफ मागे पडला आहे. नेते फक्त ‘फ्लेक्स’वरच टांगलेले आहेत आणि आंबेडकरी जनता एका आधारहिन पोकळीत टांगलेली आहे. वस्त्यावस्तांतच आपापसात कडाक्याची भांडणे सुरु आहेत. मनुवादी पक्षाचे भा.ज.पा. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे दलाल झालेले गट इतर गटांतील कार्यकर्त्यांना धडाशिकविण्यासाठी मनुवादी गुंडांना सोबत घेत आहेत. या असल्या लुती लागलेल्या गटांनी समाजात आर.एस.एस.ला रस्ते मोकळे करुन देण्याची सुपारीच घेतली आहे. याचे किती गंभीर परिणाम समाजाला भविष्यात भोगावे लागतील याचे भान या चाट्या गुलामांना राहिलेले नाही. एका भयानक शोकांतिकेचा हा प्रारंभ आहे. मनुवादी विचारधारेच्या पक्षांनी दलितांच्या चळवळीवर खूनी हल्लेच केलेले आहेत. अगदी भागवत जाधवापासून ते नरेश गायकवाड पर्यंत शेकडो आंबेडकरी कार्यकर्त्यांचे खून पाडले आहेत. मनुवादयांचा रक्तलांच्छित दलितविरोधी इतिहास जाणीवपूर्वक विसरुन काही हरामजादे गटबाज नेते सत्तेच्या तुकड्यांसाठी मनुवादी विचारधारेच्या सराईत गुंडांना वापरून त्यांच्या राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी खेळी करताहेत ही तर नीचपणाची कमाल आहे. ही आंबेडकरी समाजाशी गद्दारी आहे. आता स्वस्थ बसून उपयोग नाही. आंबेडकरी समाजातील सच्चे कार्यकर्ते, विचारवंत, कलावंत, साहित्यिक धम्माचारी यांनी आता झोपेच्या सोंगातून बाहेर येवून वास्तवाला भिडण्याची वेळ आली आहे. मनुवादी विचारधारेच्या पक्षांबरोबर (भाजप, काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाकप, माकप), बरोबर युतीचे धंदे करुन आंबेडकरी चळवळीला संपविण्यासाठी मनुवादी गुंडांना सुपाऱ्या देणाऱ्या कम अस्सल दलालांचे सारे मनसुबे उध्वस्त केले पाहिजेत. आपापसातील सर्व मतभेद गाडून ‘आंबेडकरी चळवळ या फितूर आणि घातकी अक्करमाशा औलादीपासून वाचविली पाहिजे. पुन्हा फुले आंबेडकरी विचारांचा वारसा उजागर करणारे संघटन उभे केलेच पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *