मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (३.५ गुण) पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या अपराजित अंशुमन समळला (३.५) २५ व्या मिनिटाला बरोबरीत रोखले आणि सरस सरासरीच्या बळावर अपराजित ध्रुव जैनने गटविजेतेपदावर झेप घेतली. परिणामी १३ वर्षाखालील गटविजेतेपद पटकाविणाऱ्या अंशुमनचा डबल धमाका मात्र हुकला. अरेना फिडे मास्टर हिरण्मयी कुलकर्णीने ११ व १२ वर्षाखालील मुलींच्या गटात सर्वाधिक गुण घेत दुहेरी विजेतेपद पटकाविले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या पुढाकाराने झालेल्या स्पर्धेमधील विजेत्या-उपविजेत्यांना संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, क्रीडाप्रमुख सुनील बोरकर, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात झालेल्या ८ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत मुलांमध्ये रीयांश कदमने (५ गुण) प्रथम, अंगद पाटीलने (४ गुण) द्वितीय, अधवान ओसवालने (३ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये मायरा गोगरीने (३ गुण) प्रथम, ध्रुवा भोसलेने (३ गुण) द्वितीय, समैरा थोरातने (२ गुण) तृतीय; १० वर्षाखालील मुलांमध्ये राज गायकवाडने (४.५ गुण) प्रथम, अर्णव साठ्येने (३.५ गुण) द्वितीय, शौर्य कोठारीने (३.५ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये थिया वागळेने (४.५ गुण) प्रथम, आराध्या पुरोने (२.५ गुण) द्वितीय, स्वरा मोरेने (२ गुण) तृतीय तर १२ वर्षाखालील मुलांमध्ये व्ही. प्रिजेशने (४.५ गुण) प्रथम, युग संघवीने (४ गुण) द्वितीय, पी. रेयानने (३ गुण) तृतीय पुरस्कार जिंकला. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूच्या डावपेचांनी रंगलेल्या कामगार महर्षी स्व. आंबेकर स्मृती चषक बुध्दिबळ स्पर्धेच्या संयोजनाचे मुंबई शहर बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी फिडे इंस्ट्रक्टर राजाबाबू गजेंगी यांनी विशेष कौतुक केले.
०००००
