सरपंचांकडून वारसा नोंदीचे दाखले, उपसरपंचांची नियमबाह्य ठेकेदारी ‘लक्षवेधी’च्या वृत्ताची दखल

योगेश चांदेकर
पालघरः डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू असून सरपंच आणि उपसरपंच नियम डावलून कारभार करत आहेत. ते दोघे पदाचा दुरुपयोग करीत असल्याचे उघड झाले आहे. गंजाड ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची लक्तरे दररोज वेशीवर टांगली जात आहेत. ‘लक्षवेधी’ ने या प्रकरणी पर्दाफाश केल्यानंतर गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सस्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार गंजाड ग्रामपंचायतीत झालेल्या घरकुल वाटपाची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नियमबाबाह्य वारसा नोंदी
या प्रकारावर पडदा पडतो न पडतो तोच गंजाड ग्रामपंचायतीतील आणखी एक गैरप्रकार उघडकीस आला आहे. वारसा नोंदीचे दाखले देण्याचा अधिकार सरपंच यांना नसताना. हे अधिकार न्यायालयाचे आहेत. असे असताना विद्यमान सरपंच यांनी गावात अनेक लोकांना वारसा नोंदीचे दाखले दिले असून, त्यामुळे गावात वाद निर्माण झाले आहेत. याप्रकरणी ग्रामसेवक रुपल संखे यांच्यांशी संपर्क साधला असता त्यांना याप्रकाराची माहिती नसल्याचे सांगत त्यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांना पाठीशी घातल्याचे दिसत असून त्यांनी सर्व ही बाब वरीष्ठ कार्यालयास कळवणे बंधनकारक असतांना या सर्व गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता त्यांच्या कामकाजावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
गरीब ‘वंचित’; श्रीमंत लाभार्थी
गंजाड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दारिद्र्यरेषेखालील अनेक लोक पंतप्रधान निवास योजनेतील घरकुलाची वाट पाहत असताना त्यांना घरकुले मिळत नाहीत; मात्र उपसरपंच कौशल कामडी यांच्या कुटुंबातील चार जणांना दारिद्ररेषेखालील घरकुलाचा फायदा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील अनेकांकडे पक्की घरी आहेत. गावातील लोक कुडाच्या घरात राहत आहेत. उपसरपंच कामडी यांनी स्वयंघोषित प्रमाणपत्र जाहीर केले असून त्यात आपण ठेकेदार नसल्याचे म्हटले आहे; परंतु प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून मिळालेल्या दाखल्याचा आधार घेतला, तर कौशल कामडी हे ठेकेदार असून त्यांची तशी नोंदणी झाली असल्याचे समोर आले आहे.
लाखोंची उलाढाल, तरी घरकुल
माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीधर वायडा यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या कागदपत्रानुसार कौशल कामडी यांनी गंजाड ग्रामपंचायतीसह अनेक ग्रामपंचायतीतील कामे ठेकेदारी पद्धतीने घेतल्याचे दिसते. यावरून ते ठेकेदार आहेत हे स्पष्ट होते; याशिवाय वायडा यांनी बँकेकडून माहितीच्या अधिकार कायद्यानुसार कामडी यांचे बँकेतील उलाढालीचे तपशील मिळवले. या तपशीलानुसार त्यांच्या खात्यात लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या कामडी यांना दारिद्ररेषेखालील पंतप्रधान निवासी योजनेतील घरकुल कसे मंजूर होते, असा प्रश्न असून सर्वंच घरकुलांचे वाटप अशाच पद्धतीने केले का, याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे.
सर्वंच जबाबदार
एकूणच गंजाड ग्रामपंचायतीतील घरकुलांच्या वाटपात मोठा गैरप्रकार झाला असून, त्यात ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, उपसरपंचासह सर्वच सदस्य जबाबदार असून या प्रकरणाची आता चौकशी करण्याची मागणी वायडा यांनी केली आहे. त्याचबरोबर दारिद्र रेषेखालील घरकुले श्रीमंतांना देताना या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गरीब कुटुंबांना मात्र डावलण्यात आले, याचीही आता प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर राज्य आणि केंद्र सरकारचे निकष डावलून घरकुले मंजूर करणाऱ्यांची ही चौकशी करण्याची मागणी वायडा यांनी केली आहे. एकीकडे लाखो रुपयांची उलाढाल दुसरीकडे आयटीआर असतांना आणि तिसरीकडे घरकुले मंजूर असे हे सर्व त्रांगडे आहे. याप्रकरणी ग्रामसेवक रूपल संखे याही तितक्याच जबाबदार असून आता तर त्यांनी या प्रकरणात हात वर केले आहेत. आता पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोट
‘उपसरपंच कामडी यांच्या कथित गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे आपण माहितीच्या अधिकारात उघडकीस आणली आहेत. त्यांनी निवडणूकही खोटया माहितीच्या आधारे लढवली. आता आपण वरिष्ठांकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. त्याचा पाठपुरावा सुरू आहे.तर सरपंच यांनी सुद्धा अधिकार नसतांना वारस दाखले दिले आहेत.
श्रीधर वायडा, माहिती अधिकार कार्यकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *