हरिभाऊ लाख्ो

नाशिक : केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पंचायत राज पुरस्कारांतर्गत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी गटातील ग्रामपंचायत, मोडाळे या ग्रामपंचायतींला पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार अंतर्गत स्वच्छ व हरित गाव या संकल्पनेकरिता पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून ग्रामपंचायतींचा सन्मान होणार आहे. ५० लाखांचा हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने ग्रामस्थांनी आंनदोत्सव साजरा केला.
केंद्र शासनाच्या वतीने पंचायत राज संस्थांना त्यांच्या सामाजिक व आर्थिक संरचनेतील उल्लेखनीय सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गौरव करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार देण्यात येतात. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांच्या संनियंत्रणाखाली पंचायत राज पुरस्कारांबाबत कार्यवाही करण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविले असून, माझी वसुधरा अंतर्गत वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन केले आहे.
महाराष्ट्रातून ६ ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाले असून, त्यामध्ये मोडाळे ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ‘स्वच्छ व हरित गाव’ या संकल्पनेत मोडाळे ग्रामपंचातयीने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल मित्तल तसेच आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके यांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे.
कोट
मोडाळे ग्रामपंचायतीस राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यातील गावांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व १७ शाश्वत विकासाची ध्येये, गरिबीमुक्त आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव, आरोग्यदायी गाव, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव आणि लिंग समभाव पोषक गाव या विषयांवर काम करावे.
– आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *