राअजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा
कुशल चोपडाची विजेतेपदाची हॅट्ट्रिकज्य
पुणे : पुरुष गटात चिन्मय सोमय्या (टीएसटी मुंबई) याने तर महिलांमध्ये सेनहोरा डीसूझा (मुंबई शहर) यांनी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत प्रथमच विजेतेपद पटकावले. नाशिकच्या तनीषा कोटेचा हिने मुलींच्या १९ वर्षाखालील गटात सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावले तर मुलांमध्ये नाशिकच्याच कुशल चोपडा याने विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेने शिवछत्रपती क्रीडा नगरीतील वेटलिफ्टिंग सभागृहात आयोजित केली होती.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात चौथ्या मानांकित चिन्मय सोमय्या याने ठाण्याच्या द्वितीय मानांकित दिपीत पाटील याच्यावर मात केली. अतिशय चुरशीने झालेला हा सामना त्याने ११-८,११-६,१४-१२,८-११,७-११,९-११, ११-८असा जिंकला. तो पुण्यामध्ये सन्मय परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. चंडीगड विद्यापीठात तो व्यवसाय व्यवस्थापन या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकत आहे.
सेनहोरा डीसूझा (मुंबई शहर) हिने अंतिम सामन्यात मनुश्री पाटील (टीएसटी मुंबई) हिचा पराभव केला. चुरशीने झालेला हा सामना तिने ७-११,१२-१०,१३-११,११-७, ११-८ असा जिंकला. वरिष्ठ गटात तिचे हे पहिलेच विजेतेपद आहे. ती एनएससीआयमध्ये वैभव पवार व रवींद्र कोटियन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिला बँक ऑफ बडोदाची क्रीडा शिष्यवृत्ती आहे.
मुलींच्या १९ वर्षाखालील गटाच्या अंतिम लढतीत तनीषा हिने अग्रमानातील खेळाडू अनन्या चांदे टीएसटी मुंबई हिच्यावर सनसनाटी विजय नोंदविला. सातव्या मानांकित तनीषाने अटीतटीने झालेली ही लढत ११-९,११-६,७-११,८-११, ११-७, ८-११,१२-१० अशी जिंकली. दोन्ही खेळाडूंनी अष्टपैलू खेळ करीत चाहत्यांना खेळाचा आनंद मिळवून दिला. तनीषाने कांगरा येथे झालेल्या विभागीय अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते ती पुण्यात एमआयटीमध्ये व्यवसाय व्यवस्थापनामध्ये पदवी अभ्यासक्रमात शिकत आहे.
मुलांच्या अंतिम लढतीत कुशल याने अव्वल मानांकनास साजेसा खेळ करीत शर्वेय सामंत याच्यावर ११-७,११-५,११-८,११-७ असा सफाईदार विजय मिळविला. तो नाशिक येथे विस्डम हायस्कूलमध्ये बारावी वाणिज्य शाखेत शिकत आहे. तनिषा व कुशल हे दोन्ही खेळाडू जय मोडक टेबल टेनिस अकादमीमध्ये जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पराग काळकर यांच्या हस्ते झाला यावेळी टेबल टेनिस संघटक राजू बोडस स्मिता बोडस मनीषा बोडस, आशिष बोडस, आश्लेषा बोडस, प्रकाश तुळपुळे, श्रीराम कोनकर, आशुतोष पोतनीस, अशोक राऊत, दीपक कानिटकर आदी उपस्थित होते.
