ठाणे : परतीच्या पावसाने पालघर जिल्ह्यातील शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. परंतु पावसाचा सामना करत तग धरून राहिलेल्या भातपिकाची कापणी, बांधणी करुन लागवडीच्या शेतातून खळे असलेल्या ठिकाणी सुमारे एक किलोमीटर ते डोक्यावर वाहुन नेण्यासाठी व झोडपणीच्या कामासाठी पुरुष मजुरांचा तुटवडा असुन ही सर्व कामे आता उपलब्ध महिला मजुरांच्या आधाराने उरकली जात आहेत. झपाट्याने विकास होणार्या शहरी भागात पुरुष मजूर आपले राहते स्थळ सोडून जास्त मजुरी मिळते म्हणून रोजंदारीवर गेल्याने ही एक विदारक परीस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे मजुरांच्या टंचाईची उणीव ही महिलांकडून पूर्ण करण्यात येत आहे. दरसाल वाढणारी महागाई, शेती औजारे, औषधे खते आणि बियाणांसह शेतीच्या इतर साहित्याच्या खरेदीवर बसलेला महागाईचा फटका, पावसाची अनियमितता, सतत बदलते वातावरण, यामुळे पिकांवर येणारे रोग त्यात मजुरांची उणीव, अश्या स्थितीत पुढील वर्षी भातशेती करावी कि नाही ह्याची चिंता आता शेतकरी बोलून दाखवत आहेत. या स्थितीचा सामना हा वसई पूर्व भागापेक्षा पश्चिम पट्ट्यात भातशेती कसणार्या शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात करावा लागत असून त्यांना महिला मजुरांचा आधार घ्यावा लागत आहे.
वसई तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात भातशेतीला येणारा खुप खर्च व मिळणारे भात ह्यात खुप नुकसान होत असून शारीरिक व मानसिक ञास सहन करावा लागतो. त्यातच आजुबाजुला शेती असणार्या सुमारे 90 टक्के शेतकर्यांनी शेती करण्याचे सुमारे दहा वर्षां पूर्वीपासून सोडले असुन ती ओस पडली आहे. माञ त्यात तयार होणारा कचरा हा कसणार्या सुपीक जमिनीत आल्याने तो साफसफाई करण्यासाठी लागवड करणार्या शेतकर्यांना अधिकचा खर्च होतो. त्यामुळे भात शेती आता परवडणारी राहिली नाही.