– प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग

उल्हासनगरः नुकताच प्रदर्शित झालेला एक चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालत असून कधी नव्हे ते दिवसरात्र चित्रपटगृहांमध्ये त्याचे खेळ सुरू आहेत. दिवसाच्या खेळांमध्ये हाउसफुल्ल जाणारा हा चित्रपट आता चित्रपटागृहाशेजारच्या रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. उल्हासनगरात कॅम्प तीन भागात असलेल्या चित्रपटगृहाशेजारी रहिवासी भागातील घरांसमोर प्रेक्षक वाहने उभी करून जात असल्याने रहिवाशांची वाहने अडकत आहेत. त्यामुळे अशा फुकट पार्किंगच्या शोधात असलेल्या प्रेक्षकांवर लक्ष ठेवण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे.

उल्हासनगरातील कॅम्प तीन भागात सर्वाधिक चित्रपटगृह आहेत. कल्याण बदलापूर राज्यमार्गावर भारत, पॅरामाऊंट, अनिल – अशोक मिराज, जवाहर, बीएमक्स असे चित्रपटगृह आहेत. सध्या या चित्रपटगृहांमध्ये नुकताच प्रदर्शीत झालेल्या पुष्पा – २ या चित्रपटास प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. अगदी रात्री १२ नंतरचे खेळही प्रेक्षकांच्या गर्दीत होत आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते चित्रपटगृह मालकांमध्ये उत्साह आहे. मात्र या चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांच्या वाहनांमुळे सर्वसामान्यांना फटका बसतो आहे.

उल्हासनगरातील कल्याण बदलापूर राज्यमार्गावर असलेल्या चित्रपटगृहांबाहेर अनेक प्रेक्षक रस्त्यावरच वाहने उभी करून जात आहेत. उल्हासनगर हे व्यापारी शहर आहे. मुख्य रस्त्यावर अनेक दुकाने आणि गोदाम आहेत. या प्रेक्षकांच्या फुकट पार्कींगमुळे दुकानदार आणि व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यातही काही प्रेक्षक शेजारच्या रहिवासी भागात वाहने उभी करून जातात. साडेतीन ते चार तास प्रेक्षकांची ही वाहने घरासमोर उभी राहत असल्याने अनेकदा रिक्षा किंवा चारचाकी वाहनांना मुख्य रस्त्यांपासून घरापर्यंत पोहोचण्यास त्रास होतो. त्यात घराच्या पार्कींगमध्ये उभी असलेली वाहने घराबाहेर काढण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे रहिवाशांची प्रेक्षकांमुळे कोंडी होऊ लागली आहे.

या फुकट्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी काही इमारती आणि बैठ्या घरातील काही सदस्य जागता पहारा देत आहेत. मात्र एका ठिकाणी मनाई केल्यास त्याच रस्त्यावर दुसऱ्या घराबाहेर प्रेक्षक वाहने उभी करून जात असल्याने कोंडी होते आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रस्त्यावरील दुकानदारांनाही असाच काहीसा त्रास सहन करावा लागतो आहे. कच्चा, तयार माल नेण्यासाठी येणाऱ्या ट्रक, टेम्पोंचालकांना आणि ग्राहकांनाही याचा फटका बसतो आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडीसह अंतर्गत रस्त्यांवरील ही कोंडीही फोडावी अशी मागणी होत आहे. याबाबत वाहतूक पोलिस निरीक्षक अविनाश भामरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *