कल्याण – येथील पश्चिमेतील काळा तलाव परिसरातील दैनंदिन साफसफाईत दिरंगाई केल्याने कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी येथील स्वच्छतेचे काम पाहणाऱ्या ठेकेदाराला ठेका रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. ठेकेदार नियुक्तीसाठी नव्याने निवीदा प्रक्रिया राबवून काळा तलाव आणि परिसरातील स्वच्छतेचे काम पाहण्यासाठी नवीन ठेकेदार नियुक्त केला जाईल, असे आयुक्त डाॅ. जाखड यांनी ध्वनीचित्रफितीद्वारे माध्यमांना दिलेल्या माहितीत जाहीर केले आहे.
कल्याण पश्चिमेतील सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या काळा तलाव (भगवा तलाव) भागात दररोज सकाळ, संध्याकाळ नागरिक फिरण्यासाठी येतात. मनोरंजनाची साधने येथे आहेत. ज्येष्ठ, वृद्ध मंडळी आपल्या नातवंडांसह येथे येतात. कल्याणमधील एक विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून काळा तलाव ओळखला जातो. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक येथे आहे. चालण्यासाठी गोलाकार मार्गिका, बगिचा येथे आहे. या सर्व सुविधांची देखभाल करण्यासाठी पालिकेने एक ठेकेदार नियुक्त केला आहे. या ठेकेदारावर येथील स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. गेल्या एक महिन्यापासून काळा तलाव परिसरात साफसफाई केली जात नव्हती. झाडांना पाणी टाकण्यात येत नसल्याने झाडे सुकत चालली होती. सुरक्षा रक्षक त्यांची जबाबदारी योग्यरितीने पाडत नसल्याच्या तक्रारी वाढत होत्या. येथील ध्वनीक्षेपण यंत्रणा बंद पडली आहे. या दैनंदिन कचऱ्यामुळे नागरिकांनी माजी नगरेसवक सुधीर बासरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांना पत्र लिहून काळा तलाव स्वच्छतेमध्ये दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी केली होती. गेल्या दहा वर्षांपासून या ठिकाणी ज्या स्पर्धात्मक पद्धतीने ठेकेदार नियुक्त केला जात होता. त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची मागणी केली होती. अनेक जागरूक नागरिकांनी काळा तलाव येथील साफसफाईच्या दिरंगाईसंदर्भात आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. आयुक्तांनी या सर्व तक्रारींची दखल घेऊन काळा तलाव ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची कार्यवाही केली. तसेच पालिकेच्या सफाई कामगारांकडून याठिकाणी दैनंदिन स्वच्छता होईल यादृष्टीने नियोजन केले. नवीन ठेकेदार नियुक्तीसाठी निवीदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले.
काळा तलाव येथे दैनंदिन स्वच्छता केली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे येथे काम करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची कार्यवाही केली. पालिका पथकाकडून याठिकाणी नवीन ठेकेदार नियुक्त होईपर्यंत दैनंदिन स्वच्छता केली जातील. – डाॅ. इंदुराणी जाखड, आयुक्त.