चेंबूर क्रीडा केंद्र, एस.आय.ई.एस. पूर्व विभाग किशोरी गटाच्या अंतिम फेरीत

मुंबई : चेंबूर क्रीडा केंद्र, एस.आय.ई.एस. यांनी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभाग किशोरी गटाच्या अंतिम फेरीत धडक दिली. तर अभिनव मंडळ, बालवीर स्पोर्टस् यांनी पूर्व विभाग किशोर गटाच्या उपांत्यपूर्व फेरी प्रवेश केला. मुंबई उपनगरने संयोजन संस्था, चारकोप यांच्या सहकार्याने संचालिका नम्रता भोसले यांच्या सौजन्याने कांदिवली, सेक्टर – २ येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. चेंबूर क्रीडा केंद्राने किशोरी गटाच्या उपांत्य सामन्यात नवशक्ती स्पोर्टस् चा ३२-१३ असा सहज पराभव करीत अंतिम फेरी गाठली. आक्रमक सुरुवात करीत चेंबुरने पूर्वार्धात २ लोण देत २१-०६ अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. उत्तरार्धात आणखी एक लोण देत सामना अगदीच एकतर्फी केला. तृप्ती माहरवा, रिया चांदोरकर यांच्या चढाई पकडिच्या तुफानी खेळाला या विजयाचे श्रेय जाते. नवशक्तीची जान्हवी शेलार बरी खेळली.

दुसऱ्या किशोरी गटाच्या उपांत्य सामन्यात एस.आय.ई.एस. संघाने हिड इंडियाचा ४१-०४ असा धुव्वा उडविला. एस.आय.ई.एस.ने पहिल्या डावात २१-०१ अशी भक्कम आघाडी घेत आर्धी लढाई जिंकली होती. दुसऱ्या डावात तोच जोश कायम राखत ३७ गुणांच्या मोठ्या फरकाने अंतिम फेरीत धडक दिली. आस्था सिंग, जयश्री पार्टे, तनुश्री शिंदे यांच्या झंझावाती खेळामुळे हा विजय शक्य झाला. किशोर गट पूर्व विभागाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत अभिनव मंडळाने चेंबूर क्रीडावर ३४-२४ अशी मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. विश्रांतीला लोण देत २९-०७ अशी आघाडी अभिनवने घेतली. विश्रांतीनंतर चेबुर क्रीडाने लोण देत सामन्यात रंगत आणली. पण अभिनवने आणखी एक लोण देत आपला विजय निश्र्चित केला. नितेश यादव, कार्तिक पाल अभिनव कडून, तर श्रावण तावडे, श्रीकांत दावरू चेंबूर क्रीडा कडून उत्कृष्ट खेळले. दुसऱ्या किशोर गटाच्या सामन्यात उपांत्यपूर्व फेरी गाठताना बालवीर स्पोर्टस् ने महाशक्तीला ३३-११ असे नमविले. आर्यन वाघमारे, सिद्धार्थ सावंत, रीतीक मेस्त्री यांच्या चतुरस्त्र खेळाने मध्यांतराला १६-०५ अशी आघाडी घेणाऱ्या बालवीरने नंतर देखील त्याच जोमाने खेळ करीत आपला विजय साकारला.

कुमारी गटाच्या पूर्व विभागात स्वराज्य स्पोर्टस् ने आराध्य स्पोर्टस् चा २४-०४ असा सहज पराभव करीत चौथी फेरी गाठली. पूर्वार्धात १७-०७ अशी स्वराज्यकडे आघाडी होती. सानिया इंगळे, सेरेना म्हसकर यांच्या धडाकेबाज खेळाला या विजयाचे श्रेय जाते. प्रथम श्रेणी गटात स्वस्तिक मंडळाने सन्मित्र मंडळावर ३८-२१ असा विजय मिळवित तिसरी फेरी गाठली. प्रथमच द्वितीय श्रेणीतून प्रथम श्रेणीत बढती मिळालेल्या संमित्राने स्वस्तिकला या सामन्यात कडवी लढत दिली. आकाश रुडले, अलंकार पाटील स्वस्तिक कडून, तर सोहम पूंदे, प्रथमेश शेळके सन्मित्र कडून उत्कृष्ट खेळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *