ठाणे : माझ्या आईने ज्या कॉलनीच्या विटा उचलल्या,घाम गाळला, त्याच कॉलनीत मी घर घेतले. आईच्या हातात चावी दिली, त्यावेळी तिला या कॉलनीत आता तुझे घर झाले, असे सांगितले तेव्हा ती खूप खूश झाली आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते, तीचा कष्टायचा घाम आणि डोळ्यातील आनंदाश्रू पाहता आले याचा आनंद आहे अशी भावना ‘मु. पो. १०, फुलराणी आणि कॉलनी’ पुस्तकाचे लेखक सिद्धार्थ पारधे यांनी व्यक्त केली.
मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वाचनकट्टा या उपक्रमात पारधे यांची मुलाखत झाली. यावेळी त्यांच्या मु. पो. १०, फुलराणी या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांनी केले. व्यासपीठावर संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर आणि पारधे यांचे कनिष्ठ बंधू, सचिन तेंडुलकरचे स्वीय सहायक रमेश पारधे आदी उपस्थित होते. निवेदिका, लेखिका वृंदा दाभोलकर यांनी पारधे यांची मुलाखत घेतली.
पारधे म्हणाले की, वाचनालय ही आजच्या काळाची गरज आहे. गोरगरीब मुलांना घरातील जागेच्या अडचणीमुळे तसेच, आजूबाजूच्या गोंगाटामुळे अभ्यास करता येत नाही. त्यांच्यासाठी वाचनालय हा मोठा आधार ठरतो. कॉलनीचा प्रवास उलगडताना ते म्हणाले, कॉलनी हे पुस्तक ज्यावेळी माझ्या आईला वाचून दाखविले तेव्हा ती म्हणाली, मलादेखील काही सांगायचे आहे आणि तिचा प्रवास सांगणारे मु. पो. १०, फुलराणी या पुस्तकाची निर्मिती झाली. साहित्य सहवास या कॉलनीच्या चौकटीत मी घडलो, त्या कॉलनीमधील ८४ फ्लॅट्सने माझ्यावर संस्कार केले म्हणून माझ्या पुस्तकाचे नाव कॉलनी असावे, असा माझा आग्रह होता. सचिनला त्याच्या घरच्यांनी त्याला डाऊन टू अर्थ राहण्याचे संस्कार दिले.
PHOTOT CAPTION
ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात निवेदिका वृंदा दाभोळकर यांनी लेखक सिद्धार्थ पारधे यांची मुलाखत घेतली.
