पारा ९.४ अंशावर
हरिभाऊ लाखे
नाशिक : ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस यामुळे काही दिवस अंतर्धान पावलेल्या थंडीचे जिल्ह्यात दमदार पुनरागमन झाले आहे. २१.९ अंशावर गेलेल्या तापमानात काही दिवसांत १२.५ अंशांची घट होऊन सोमवारी ते ९.४ अंशावर आले. निफाडच्या कृषी विज्ञान केंद्रात ६.७ अंश तापमानाची नोंद झाली. हवामानात वेगाने बदल झाल्यामुळे हुडहुडी भरल्याचे चित्र आहे.
नोव्हेंबरच्या अखेरीस शहरात कडाक्याच्या थंडीने मुक्काम ठोकला होता. गेल्या ३० नोव्हेंबरला ८.९ अंश ही हंगामातील नीचांकी पातळी गाठली गेली. हा दिवस मागील आठ वर्षातील नोव्हेंबरमधील शहरातील सर्वात थंड दिवस ठरला होता. कारण, याआधी २०१६ मध्ये नोव्हेंबर महिन्यात ८.८ अंशाची नोंद झाली होती. डिसेंबरच्या सुरुवातीला हवामान बदलले. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे वातावरण ढगाळ झाले. थंडीची तीव्रता कमी होऊ लागली. याच सुमारास दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. या घटनाक्रमात थंडी जणू गायब झाल्याची स्थिती होती. किमान तापमान २१ अंशावर पोहोचले होते.
आकाश हळूहळू निरभ्र होऊ लागल्याने थंडीची तीव्रता पुन्हा जाणवू लागली आहे. रविवारी शहरात १२. ५ अंशाची नोंद झाली होती. सोमवारी त्यात तीन अंशानी घट होऊन ते ९.४ वर आल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. निफाडच्या कृषी विज्ञान केंद्रात ६.७ अंशाची नोंद झाली. या केंद्रावरील हंगामातील ही नीचांकी नोंद आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव स्थानिक वातावरणावर पडतो. डिसेंबर, जानेवारीत कडाक्याच्या थंडीची अनुभूती मिळते. यंदा नोव्हेंबरपासून तशी स्थिती होती. मध्यंतरी गायब झालेली थंडी पुन्हा दाखल झाल्यामुळे गारव्याचा आनंद मिळू लागला आहे. दिवसाही कमालीचा गारठा जाणवतो. हंगामात ८.९ नीचांकी तापमानाची नोंद झाली. पुढील काळात तापमान अधिक खाली येण्याची शक्यता आहे.