नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे लोकार्पण झालेले प्रकल्प, इमारती उपयोगात असल्याची खात्री संबधित विभागाने करुन घ्यावी व अद्याप कार्यान्वित न झालेल्या नागरी सुविधा तत्परतेने वापरात येतील याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे आणि याबाबतचा आढावा घेऊन त्याचा तपशील सादर करावा असे निर्देश देत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत सद्यस्थितीत सुरु असलेल्या व नियोजित असलेल्या सुविधा कामांचा आणि प्रकल्पांचा बाबनिहाय आढावा घेतला.
मालमत्ता विभागाने महानगरपालिकेच्या पूर्ण झालेल्या मात्र सध्या वापरात नसलेल्या इमारती, वास्तू अशा मालमत्तांची यादी त्वरित तयार करावी आणि वापरात नसलेल्या वास्तू वापरात येण्यासाठी संबधित विभागांशी समन्वय साधावा आणि मालमत्ता वापरात येण्याच्या दृष्टीने पुढाकार घेऊन काम करावे असे आयुक्तांनी निर्देशित केले. या वास्तू तत्परतेने वापरात आणण्याची जबाबदारी संबधित विभागप्रमुखाची राहील असे स्पष्ट करीत आयुक्तांनी त्यातही प्राधान्याने तयार असलेले मार्केट वापरात येतील याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे असे निर्देश दिले.
दिव्यांग व्यक्ती, महानगरपालिकेच्या इटीसी केंद्रातून व्यवसाय प्रशिक्षित झालेले दिव्यांग तसेच महिला बचतगट यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना खात्रीशीर बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या मार्केटमधील किमान 30 टक्के जागा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
मार्केटप्रमाणेच व्यावसायिक गाळे, कार्यालयासाठी जागा, समाजमंदिरे, पाळणाघर, विरंगुळा केंद्रे अशा विविध मालमत्ता वापरात आणण्यासाठी संबधित विभागप्रमुखांनी तत्पर कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. या बाबीकडे नियमित लक्ष देता यावे व त्यावर नियंत्रण रहावे यादृष्टीने ऑनलाईन पोर्टल तयार करावे असेही सूचित करण्यात आले.
सर्व विभागांनी त्यांच्यामार्फत सद्यस्थितीत सुरु असलेली कामे व करावयाची नियोजित कामे यांचा आढावा घ्यावा आणि त्यांच्या कार्यपूर्ततेच्या कालावधीवर अर्थात टाईमलाईनवर लक्ष द्यावे असे निर्देश देतानाच सुविधापूर्तीसाठी महसूल हा महत्वाचा भाग असल्याने करवसूलीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. त्यामध्ये मालमत्ताकर हा उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत असल्याने उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वसूलीचा प्राधान्यक्रम ठरवून पावले उचलावीत असे स्पष्ट केले. विभाग कार्यालय स्तरावर काम करणा-या मालमत्ता कर विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी आपले संपूर्ण लक्ष करवसूलीवर द्यावे असे सूचित करतानाच या कर्मचा-यांना करवसूली व्यतिरिक्त इतर कामे देण्यात येऊ नयेत असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई महानगरपालिकेने ई – ऑफिस कार्यप्रणाली सुरु केली असून यापुढील नवीन सर्व नस्ती या ऑनलाईन कार्यप्रणालीव्दारे निर्माण कराव्यात व सर्व विभागांनी ई – ऑफिस कार्यप्रणालीचा प्रभावी वापर करावा असे आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले. त्याचप्रमाणे महानगरपालिकेमार्फत नागरिकांना पुरविण्यात येणा-या सर्व लोकसेवा ऑनलाईन उपलब्ध करुन द्याव्यात व त्या महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलशी जोडलेल्या असाव्यात असे स्पष्ट करीत याबाबतची कार्यवाही शासनाच्या संबधित विभागाशी संपर्क साधून लवकरात लवकर करुन घ्यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
अनेक मोठे प्रकल्प व सुविधा कामांसाठी केंद्र सरकारमार्फत निधी उपलब्ध होतो. त्याची माहिती घेऊन सदर निधी प्राप्त करुन घेण्याबाबत संबंधित विभागांनी कार्यवाही करावी व या माध्यमातून नागरिकांना उत्तम गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत असेही आयुक्तांनी निर्देश दिले. पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांचे आत्तापासूनच नियोजन करावे असेही आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड व इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *