गेल्या दहा वर्षात देशभरात झालेल्या अपघातात १५ लाख ३० हजारांहून अधिक अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय रस्ते मंत्रालयाने ही आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या संकेत स्थळावर ही आकडेवारी उपलब्ध असून त्यानुसार सण २०१३ ते २०२३ या दहा वर्षात रस्ते अपघातात बळी पडलेल्यांच्या संख्येत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानावर उत्तर प्रदेश तर दुसऱ्या स्थानावर तामिळनाडू ही राज्ये आहेत. महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यासाठी ही आकडेवारी भूषणावह नाही. रस्ते अपघातात जर इतके लोक दरवर्षी मरण पावत असतील तर ती चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांशी मृत्यू हे २० ते ५० या वयोगटातील आहे. याचाच अर्थ रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू हे तरुणांचे होत आहेत. ज्या तरुणांकडे देश भावी आधारस्तंभ म्हणून पाहत असतो तेच तरुण जर असे अकाली मृत्यू पावत असेल तर ती देशाची मोठी हानी आहे. केवळ सर्वसामान्य तरुणच नाही तर देशातील अनेक महनीय व्यक्तींचा मृत्यू देखील रस्ते अपघातात झाला आहे. दोन वर्षापूर्वी शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठा समाजाचीच नव्हे तर राज्याची मोठी हानी झाली. त्यांच्या अपघाती निधनातून राज्य सावरत नाही तोच टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले. सायरस मिस्त्री यांचा गुजरातच्या अहमदाबादवरून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर चारोटी जवळ सुर्या नदीच्या पुलावर अपघात झाला. सायरस मिस्त्री यांचे देशाच्या औद्योगिक विकासात महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या निधनाने उद्योग विश्वात मोठी शोककळा पसरली होती. सायरस मिस्त्री, विनायक मेटे यांच्यासारख्या समाजातील महनीय व्यक्तींच्या अशा अकाली निधनाने समाजाचे मोठे नुकसान होत आहे. विनायक मेटे, सायरस मिस्त्री हे समाजातील महनीय व्यक्ती आहेत म्हणून त्यांच्या निधनाची बातमी झाली. रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो देशात सर्वात जास्त मृत्यू रस्ते अपघातात होतात. अपघातात जखमी आणि कायमचे जायबंदी होणाऱ्यांची संख्या तर अगणित आहे. विशेष म्हणजे यात तरुणांचा समावेश अधिक आहे. ज्या तरुणांच्या जोरावर आपण महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहोत त्याच तरुणांचे अपघातात निधन होत असेल तर ती देशाची मोठी हानी आहे. अनेक प्रयत्न करूनही देशातील रस्ते अपघातांची संख्या का कमी होत नाही हा संशोधनाचा विषय आहे. वाढत्या रस्ते अपघातांना जितकी व्यवस्था जबाबदार आहेत तितकीच मानवी चुकाही जबाबदार आहेत. टोलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची वसुली केली जात असतानाच महामार्गावर जीवघेण्या ब्लॅकस्पॉट मध्ये सुधारणा होत नाही. त्याचप्रमाणे रस्त्यांवरील खड्डे, धुळीचे साम्राज्य, महामार्गावरील अतिक्रमणे, सर्व्हिस रोडचा अभाव, रस्त्यावरच उभी केली जाणारी अवजड वाहने, बंद पडलेल्या वाहनांसाठी कमी पडत असलेली मदत केंद्रे, मोकाट जनावरे, अपुरे दुभाजक याबाबी अपघातांसाठी कारणीभूत ठरत आहेत.
महामार्गावर वाहन चालकांकडून वेग मर्यादा पाळण्यात येत नाही. बहुतेक प्रवासी १०० किमी पेक्षा अधिक वेगाने वाहने चालवतात. ट्रक व इतर मोठ्या वाहनांकडून लेनची शिस्त पाळली जात नाही. काही वाहन चालक तर दारु पिऊन वाहने चालवतात तर काही वाहन चालक वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलतात. वाहनांची व्यवस्थित निगा न राखणे, सीट बेल्ट न लावणे या गोष्टीही अपघातास कारणीभूत ठरतात. नियम माहीत असूनही चालक त्यांचे पालन करत नाहीत. सगळ्यांनाच कमी वेळात आपले ठिकाण गाठायचे असते. नियमांचे पालन न केल्यानेच अपघातांची संख्या कमी होत नाही. अपघातांची संख्या कमी करायची असेल तर वाहन चालकांना नियमांचे पालन करावेच लागेल. नियम पाळा अपघात टाळा!

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *