राजकीय नेत्यांनी स्वप्ने पाहण्यात, महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काहीच वावगे नाही; परंतु स्वप्न प्रत्यक्षात उतरेल का, तेवढी उडी घेण्याची आपली पात्रता आहे का, कुवत आहे का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. ते न पाहता उडी घेतली, तर त्याचे मग हसे होते आणि आयुष्यभर एकदा चिटकलेला राजकीय डाग काही जात नाही. इंद्रकुमार गुजराल, एच. डी. देवेगौडा आणि चंद्रशेखर यांच्यासारखे भाग्य अपवादानेच वाट्याला येते. योग्यता असूनही संख्याबळ पाठिशी नसले, की काय होते, याचा अनुभव शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या पाठिशी आहे. संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांचीही गत पवार यांच्यासारखीच झाली. विरोधी ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व करण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या इच्छेकडे आता या पार्श्वभूमीवर पाहायला हवे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या दारुण पराभवानंतर आता ‘इंडिया’आघाडीची एकजूट तुटताना दिसत आहे. बॅनर्जी यांच्या ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व करण्याबाबतच्या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, समाजवादी पक्ष, ‘आप’ ‘नॅशनल कॉन्फरन्स’ राष्ट्रीय जनता दल आदी पक्षांनी पाठिंबा देऊन राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरच शंका घेतली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राहुल यांना यश आले, तेव्हा हेच पक्ष त्यांची पाठराखण करीत होते आणि आता दोन राज्यांत पराभव झाल्यानंतर त्यांनी मित्रालाच अडचणीत आणायचे ठरवले आहे. दुसरीकडे समाजवादी पक्षाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीपासून वेगळे होण्याच्या वक्तव्यानंतर आता निषेधाचा आवाज बुलंद होऊ लागला आहे. ‘इंडिया’आघाडीचे नेतृत्व बदलण्याची मागणी मित्रपक्ष करत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ‘इंडिया’आघाडीच्या अध्यक्ष बनवण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारमध्ये अनेकवेळा मंत्री राहण्यासोबतच २०११ पासून त्या सातत्याने मुख्यमंत्रिपद भूषवत आहेत. देशभर चौखूर उधळत असलेला भाजपचा वारू त्यांनी यशस्वीपणे रोखला आहे. भाजपला तितक्याच खंबीरपणे आणि लढाऊ वृत्तीने त्या उत्तर देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्या वारंवार ललकारत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून कोणावरही तुटून पडायला त्या घाबरत नाहीत. हे खरे असले, तरी तेवढ्यावर भाजपविरोधकांची मोट यशस्वीपणे त्या बांधू शकतील का, याबाबत रास्त शंका आहेत. आक्रस्ताळेपणा, धसमुस‍ळेपणा, भांडखोरपणा, चिडचिडेपणा एका ठराविक मर्यादेपर्यंत आणि ठराविक प्रदेशात यशस्वी होत असेलही; परंतु तेच भांडवल देशभरात उपयोगी पडत नाही, याची जाणीव सध्या त्यांची पाठराखण करणाऱ्या नेत्यांनाही आहे; परंतु खरेच जेव्हा ममता यांच्या पाठिशी उभे राहण्याची वेळ येईल, तेव्हा त्यांना राहुल गांधी यांचाच पर्याय योग्य वाटेल. सध्या काँग्रेसवर दबाव आणण्यापुरती ममतांच्या फुग्यात हवा भरून नंतर त्याला कधी टाचणी लागेल, हे ममतांना ही कळणार नाही.
ममता यांना ‘इंडिया’आघाडीच्या अध्यक्ष करा, असे पवार म्हणाले आहेत. नेतृत्व बदलाची गरज असून नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न वारंवार हाणून पाडणाऱ्या बॅनर्जी या नेत्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीचा संदर्भ त्यासाठी त्यांनी दिला. पश्चिम बंगालच्या सीमेबाहेर पक्षाचा विस्तार केला, हे पवार यांचे म्हणणे अर्धसत्य आहे. त्यांनी गोवा, बिहार, उत्तर प्रदेशापासून ईशान्यकडे प्रयत्न केले; परंतु त्रिपुरात थोडे यश त्यांना मिळाले. नंतर ते ही टिकले नाही. शिवसेनेच्या प्रिंयका चतुर्वेदी यांनीही देशाचे संविधान वाचवण्यासाठी ममता बॅनर्जी महान नेत्या आहेत, त्या सर्वांना सोबत घेऊन जातात. त्यांनी भाजपविरोधात चांगली लढत दिली असून नेतृत्वासाठी जे काही चांगले होईल ते ते करणार आहेत, असे म्हटले आहे. समाजवादी पक्षाने बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला उघडपणे पाठिंबा दिला आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात सलग निवडणुकीतील पराभवानंतर बॅनर्जी आपल्या नेतृत्व कौशल्याने ‘इंडिया’ आघाडी मजबूत करतील, असे समाजवादी पक्षाने म्हटले आहे. अर्थात पक्षाचे प्रवक्ते उदयवीर सिंह यांची ही भाषा आहे. ती अखिलेश यादव यांची नाही. संसदेच्या अधिवेशनात काँग्रेसने ‘इंडिया’ आघाडीतील घटकपक्षांचा विचार न करताच अदानीच्या मुद्द्यावरून कामकाज होऊ दिले नाही. काँग्रेस जनसामान्यांच्या मुद्यांऐवजी जनतेच्या हिताच्या नसलेल्या मुद्यांना कवटाळून बसते आणि वारंवार तोंडावर पडते. त्यातून काँग्रेसला ताळ्यावर आणण्यासाठी ममतांच्या नेतृत्वाचा मुद्दा पुढे केला आहे. संभल, महागाई, बांगला देशातील हिंदू मंदिरावर होणारे हल्ले, ईशान्येकडील राज्यांसाठी बांगला देश सरकारचे अडचणीत आणणारे धोरण या मुद्यांवर समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेसला चर्चा हवी आहे; परंतु ज्या मुद्यांचा आक्रमकपणे प्रचार करूनही दोन राज्यांत जनतेने नाकारले, त्याच मुद्यांना काँग्रेस कवटा‍ळून बसल्याने मित्रपक्षांनी काँग्रेसची कोंडी केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल यांना मोदी यांच्यासमोर चेहरा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे ‘इंडिया’आघाडीत पुन्हा अराजकता माजली आहे. यापूर्वी ‘इंडिया’ आघाडीचे निमंत्रक आणि समन्वयक न केल्यामुले नाराज होऊन नितीश कुमार ‘एनडीए’मध्ये दाखल झाले. नितीश कुमार यांच्याकडे नेतृत्व सोपवले असते, तर ते आणखी काही दिवस तिथे राहिले असते. बॅनर्जी यांना आता ममता यांना ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्या बनवण्याची मागणी होऊ लागली आहे. या मागणीला अप्रत्यक्षपणे तेजस्वी यादव यांचा पाठिंबा मिळत आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीअगोदर हे विधान करून तेजस्वी यांनी काँग्रेसला दुय्यम भूमिका घ्यायला भाग पाडण्याची रणनीती आखली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत १०१ खासदारांमुळे काँग्रेस सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याने राहुल अघोषितपणे ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व करत आहेत. ममता यांच्यापेक्षा जास्त जागा जिंकून लोकसभेतील तिसऱ्या क्रमाकांच्या जागा मिळवणाऱ्या समाजपक्षाला २९ जागा मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व मान्य होईल का, हा खरा प्रश्न आहे.ममता म्हणाल्या, की आज जर ‘इंडिया’ आघाडीचे भाजप आणि मोदी यांच्याविरुद्ध प्रामाणिकपणे लढा दिला, तर ती नक्कीच मजबूत होईल; परंतु त्यासाठी निर्णय घेणारा नेता हवा. तो नेता कोण असेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. काँग्रेसमधून स्थापन झालेली तृणमूल काँग्रेस अजूनही पश्चिम बंगालपुरती मर्यादित आहे आणि यामुळेच राहुल गांधी तृणमूल काँग्रेसलाही समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल यांच्याप्रमाणे प्रादेशिक पक्ष मानतात. ममता २०१९ पासून राष्ट्रीय स्तरावर सक्रियपणे प्रचार करत आहेत. पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे; पण थोडे अंतर चालल्यावर थांबावे लागते. कारण कुठून तरी अडथळा निर्माण होतो. २०२१ च्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका जिंकूनही ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला मागे टाकून विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला; पण विरोधी गटातील अनेक नेत्यांनी या मार्गात अडथळे निर्माण केले. राहुल कदाचित ‘इंडिया’ आघाडीला यशस्वी करू शकणार नाहीत; पण तृणमूल काँग्रेसची काँग्रेसइतकी व्यापक पोहोच नाही किंवा ममता यांचा प्रभावही नाही. प्रादेशिक नेत्यांमध्ये ममता यांचा दर्जा नि:संशय मोठा आहे; पण त्यांना स्वतःच्या मर्यादा आहेत. राम मंदिर उद्‌घाटन समारंभाच्या मुद्यावर भूमिका घेणाऱ्या ममता कदाचित सर्वप्रथम असतील; परंतु काँग्रेसकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांपेक्षा तिप्पट खासदार आहेत. हिंदी नीट न येणे हीदेखील ममता यांची मोठी कमतरता मानली जाते आणि ती त्यांना स्वतःला जाणवते. ‘सोशल मीडिया’वरही ममता यांच्यापेक्षा राहुल यांचे चारपट जास्त फॉलोअर्स आहेत आणि अखिलेश यादव यांच्यापेक्षा तिप्पट फॉलोअर्स. हे खरे आहे, की विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना राहुल आवडत नाहीत; पण ममता यांचा स्वीकार त्याहूनही कमी आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *