मुंबई : मुंबई अस्वच्छ करणाऱ्यांकडून गेल्या आठ महिन्यांत क्लीन अप मार्शलने कारवाईचा बडगा उगारून तब्बल ३४ कोटी १९ लाख रुपये दंड वसूल केला आहे. सर्वाधिक म्हणजेच सहा कोटी रुपयांहून अधिक दंड पालिकेच्या ए विभागातून वसूल करण्यात आला.

मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक स्वच्छतेdचे नियम मोडणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी २ एप्रिलपासून क्लीन अप मार्शलची नेमणूक केली आहे. सुरुवातीला पालिकेच्या ए विभागात तंत्रज्ञानाचा आधार घेवून डिजीटल पद्धतीने कर आकारणी करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर, ए विभागातील सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन पालिकेच्या अन्य विभागातही क्लीनअप मार्शलची नेमणूक करण्यात आली. सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या २४ विभागात एकूण १०८७ क्लीन अप मार्शलच्या सहाय्याने अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येतत आहे. पालिकेच्या विविध विभागांतील क्लीन अप मार्शल्सने आतापर्यंत केलेल्या १ लाख १८ हजार ५३२ कारवाईतून तब्बल ३४ कोटी १९ लाख ६ हजार ७१२ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. चर्चगेट, कुलाबा, सीएसएमटीचा भाग असलेल्या ए विभागातून सर्वाधिक म्हणजेच ६ कोटी ३३ लाख ३ हजार ७१२ रुपये दंड वसूल करण्यात पालिकेला यश आले. त्यापाठोपाठ आर मध्य विभागातून २ कोटी ८४ लाख ४ हजार ८०० रुपये, आर दक्षिण विभागातून २ कोटी ४५ लाख ६ हजार ७०० रुपये, तर एफ उत्तर विभागातून २ कोटी २६ लाख ६ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. पालिकेच्या एम पश्चिम विभागातून सर्वात कमी म्हणजेच ३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना आकारलेल्या दंडाची पावती हाताने न लिहिता मोबाइल ॲपद्वारे छापील पावती दिली जाते. तसेच, ऑनलाईन पद्धतीने दंड भरण्याचाही पर्याय पालिकेतर्फे उपलब्ध करण्यात आला आहे. डिजीटल कार्यवाहीमुळे कोणत्या दिवशी किती दंड आकारणी झाली, कोणत्या जागेवर, कोणत्या विभागात, कोणत्या प्रकारासाठी दंड आकारणी झाली, याचा अचूक तपशील मिळणे महापालिकेला सोपे झाले आहे. दरम्यान, यासंदर्भात महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

८ डिसेंबर रोजी ७३ हजार रुपये दंड वसूल महापालिकेच्या २४ विभागांत ८ डिसेंबर रोजी अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात केलेल्या दंडात्मक कारवाईतून ७३ हजार ८०० रुपये वसूल करण्यात आले. ३६२ प्रकरणांतून हा दंड वसूल करण्यात आला. पालिकेच्या ए विभागातून सर्वाधिक म्हणजेच ३६ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. या विभागात एकूण ११८ क्लीन अप मार्शल कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *