अशोक गायकवाड
नवी मुंबई : रायगड किल्ला व परिसर पर्यटन विकासाचे काम उत्तम दर्जाचे व जलदगतीने व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राधिकरणाशी समन्वय राखून काम करावे. यासाठी शासनाव्दारे मंजूर झालेला निधी १०० टक्के खर्च होईल यासाठी योग्य नियोजन करावे. अशा सूचना रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी खासदार, छत्रपती संभाजी राजे यांनी केले.
माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण भवन येथील आयुक्त कार्यालयाच्या मुख्य दालनात सोमवारी, (दि.९ डिसेंबर) रोजी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस कोकण विभागाचे महसूल आयुक्त डॉ. राजेश देशमूख, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे, उपआयुक्त(नियोजन) प्रमोद केंबावी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद सत्यजित बडे, रायगडचे उप जिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, महाडचे उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापूरे, रायगड पाणी संवर्धन विभागाचे अधिक्षक अभियंता संजय शिंदे, रोहाचे सहाय्यक वनसंरक्षक रोहित चोबे, पेण-रायगड विद्यूत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमती संजिवनी कट्टी तसेच प्राधिकारणाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रायगड किल्ला संवर्धन व किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्यासाठी शासनाद्वारे निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानूसार आराखडा तयार करण्यात आला असून आराखडयातील कामांची अंदाजपत्रके तयार करुन निविदा प्रक्रीय पूर्ण झाल्या आहेत. यावेळी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटनाची कामे उत्तम दर्जाची आणि जलद गतीने होण्यासाठी उपसमिती गठीत करण्याच्या सुचना आराखडा प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी खासदर छत्रपती संभाजी राजे यांनी संबंधितांना दिल्या. या बैठकीत किल्ल्यांचा इतिहास जिवंत करुन दाखविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन “शिवसृष्टी” निर्माण करण्यात येणार असल्याबाबतचे सादरीकरण करण्यात आले. यात रायगड किल्ल्यावर प्राचिन वस्तूंचे संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पर्यटकांना मनोरंजनासह गड-किल्ल्यांची माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. किल्ल्यावरील सर्व वस्तूंचे माहिती संग्रहण करण्यात येणार आहे. रायगड किल्यावरील चित्त दरवाजा, नाना दरवाजा, खुबल्दा बुर्ज, महादरवाजा आदींचे संवर्धन व जिर्णोद्धार करणे, तसेच पर्यटक व शिवप्रेमींना रायगडावर पोहचण्यासाठी मजबूत पायवाटा निर्माण करणे, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आदी महत्वाच्या सोयी उपलब्ध करून देणे, जलसंवर्धन करणे याबाबींचा समावेश आहे. याशिवाय पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधी व जिजामाता वाडा यांच्या संवर्धन व जिर्णोद्धाराचे कार्य तसेच याठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावीत आहे. प्रगत संगणन विकास केंद्र (सीडॅक) व्दारे आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी विविध ॲप तयार करण्यात येणार आहेत. तसेच व्हिज्यूअल तंत्रज्ञानाचा वापर करुन पर्यटकांना गड-किल्ले आणि इतिहासातील माहिती देण्यासाठी विविध ठिकाणी दालने तयार करण्यात येणार आहेत. याचे प्रारुप स्वरुपाचे सादरीकरण प्रगत संगणन विकास केंद्र (सीडॅक) च्या अधिकाऱ्याव्दारे याबैठकीत करण्यात आले. या बैठकीत रायगड जलसंधारण विभागाव्दारे रायगड किल्ला, शिवसृष्टी आणि परिसरातील गावांसाठी भवीष्यात ३० वर्षे पूरेल या दृष्टीकोनातून पाण्याचे नियोजन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या आराखड्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.