अनिल ठाणेकर
ठाणे : भारतीय लष्करातील सैनिक हे अहोरात्र आपल्या सीमेवर रक्षण करत असतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता दाखविण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीची संकल्पना अंमलात आणली आहे. या निधीच्या माध्यमातून सैनिक/माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाते. त्यामुळे शासकीय कार्यालय, जबाबदार नागरिकांनी ध्वज दिन निधीसाठी सढळ हाताने मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यावर्षी रु. १ कोटी ८४ लाख ८० हजार एवढे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आलेले आहे, अशी माबिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) हरिश्चंद्र पाटील यांनी दिली.
सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलनाचा ठाणे जिल्ह्यातील शुभारंभ कार्यक्रम आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडला. त्यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील बोलत होते. कॅप्टन वाय. के. राव, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायके, नौदलातील लेफ्टनंट अभिषेक कुमार सिंह, ठाणे तहसीलदार किशोर मराठे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर मेजर (नि.) प्रांजळ जाधव यांच्यासह विविध कार्यालयांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले की, गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यासाठी ध्वजदिन निधी संकलनाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालये, दानशूर व्यक्ति, संस्थांनी हातभार लावला आहे. या वर्षीही ठाणे जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणावर योगदान द्यावे. या निधीच्या माध्यमातून माजी सैनिक, शहिद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता-पिता तसेच पाल्यांना आर्थिक मदत दिली जाते. या निधीतून सहाय्यासाठी माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता-पिता तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांनी अर्ज करावेत.भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करुन त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी तसेच युध्दात अपंगत्व आलेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनीयोग केला जातो. आपल्या सैनिकांचे ऋण अल्पस्वरुपात फेडण्याची संधी जनतेला ध्वजदिनांच्या निमित्ताने प्राप्त होत असते. त्यामुळे नागरिकांनी सढळ हस्ते जिल्हाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यांचे नावे धनादेश/धनाकर्ष किंवा QR कोड द्वारे करून ध्वजदिन निधीस सक्रिय हातभार लावावा व सैनिक मनोबल वाढवावे, असे आवाहनही श्री. पाटील यांनी यावेळी केले.
माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमांसाठी संपूर्ण देशात ०७ डिसेंबर हा दिवस ध्वजदिन म्हणून पाळण्यात येतो व त्यानिमित्ताने ०७ डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर पर्यंत निधी गोळा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ध्वजदिन निधी संकलनास आज प्रारंभ झाला.
राज्य शासनाकडून ठाणे जिल्ह्यास गतवर्षी रु. १कोटी ८४ लाख ८० हजार रुपये एवढे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.०त्यापैकी ७५ % उद्दिष्ट पूर्ती करण्यात आली आहे. यावर्षी सुध्दा रु. १ कोटी ८४ लाख ८० हजार एवढे ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आलेले आहे. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या ज्या पाल्यांनी इयत्ता १० मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत, अशा पाल्यांचा सैनिक कल्याण विभागा मार्फत शाल-श्रीफळ, प्रशस्तीपत्र आणि २० हजार रुपयांचा धनादेश देवून विशेष गौरव पुरस्कार देण्यात आला.यावेळी ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य केलेल्या संस्था, व्यक्तिंचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिकांना कल्याणकारी निधीचे वाटप करण्यात आले. मेजर (नि.) श्री. जाधव यांनी प्रास्ताविकात ध्वजदिन निधी संकलनाची पार्श्वभूमी सांगून ठाणे जिल्ह्याने केलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी ध्वज दिन निधी संकलनात ठाणे जिल्ह्याने केलेल्या कार्याचा गौरव म्हणून सैनिक कल्याण मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या स्मृतीचिन्ह श्री. पाटील यांच्या हस्ते जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि.) जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *