ताज्या पोटनिवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी करून अखिलेश यादव यांना जमिनीवर आणले. लोकसभा निवडणुकीत यश डोक्यात गेल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जे झाले, तेच उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यांचे झाले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी आणि दीड वर्षात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी हा निकाल उपयोगी पडणार आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिली. तशीच धोबीपछाड या आघाडीने उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना दिली. मात्र तशीच परतफेड योगी आदित्यनाथ यांनी करून अखिलेश यादव यांना जमिनीवर आणले. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी यश डोक्यात गेल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे झाले, तेच उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यांचे झाले. देशभर निवडणुकीतील प्रचाराचे चलनी नाणे झाले असताना योगींनी उत्तर प्रदेशवरील पकड ढिली होऊ दिली नाही, हे उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकांच्या निकालावरून दिसते. नऊ जागांच्या या निकालामुळे सत्ता समीकरणात काहीही फरक पडणार नसला, तरी भाजपच्या कार्यकर्त्यांचा लोकसभेच्या निवडणुकीनंतर कमी झालेला आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी आणि दीड वर्षात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी हा निकाल उपयोगी पडणार आहे. या वेळी उत्तर प्रदेशमध्ये नऊ जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुका योगी यांच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न बनल्या होत्या. समाजवादी पक्षाचे बालेकिल्ले उद्ध्वस्त करताना अखिलेश यांना मोठे धक्के दिले. साठ टक्क्यांहून अधिक मुस्लिम असलेल्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार सव्वा लाखपेक्षा अधिक मतांनी जिंकतो, हा मोठा संदेश आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि योगींना ज्या प्रकारच्या पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यातून बाहेर पडण्यास पोटनिवडणुकांचे निकाल पक्षाला मदत करू शकतील. योगींनी लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच पोटनिवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला होता. तो त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवला.
भारतीय जनता पक्षातील कथित अंतर्गत कलहाचा परिणाम या निवडणुकांमध्ये दिसून आला नाही. सर्वांनी संघटित होऊन जोमाने प्रचार केला. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात योगी यांनी पाच दिवसांमध्ये 15 सभा घेतल्या. यावरून याचा अंदाज लावता येतो. योगी सरकारने नऊ जागांवर 30 मंत्र्यांची टीम तयार केली होती. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनीही सर्व नऊ जागांवर प्रत्येकी एका निवडणूक सभेला संबोधित केले. त्यांचा संपूर्ण जोर फुलपूर आणि माळवण या जागांवर होता. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनीही पोटनिवडणुकीत नऊ जागांवर प्रत्येकी एक सभा घेतली. दुसरीकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या वेळी पूर्ण ताकदीने भाजप उमेदवारांच्या प्रचारात उतरला होता. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गैरहजेरीमुळे भाजपचे नुकसान झाले होते. योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे ते कटेंगे’ या घोषणेची उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात जोरदार चर्चा झाली; परंतु तिथल्या पोटनिवडणुकीत या घोषणेची अजिबात चर्चा नव्हती. असे असताना समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या घोषणेला जीवदान दिले आणि त्यांच्या पक्षाने या घोषणाबाजीला थट्टा मानून खिल्ली उडवली. हे केवळ आपल्या मूळ मतदारांना खूश करण्यासाठी केले गेले; परंतु त्याचा उलटा परिणाम झाला. दुसरीकडे, योगी आदित्यनाथ यांनी कायदा आणि सुव्यवस्था तसेच बेरोजगारीवर लक्ष केंद्रित केले. योगी आदित्यनाथ सर्व टीकेला न जुमानता बुलडोझर चालवून न्याय मिळवून देण्यावर ठाम राहिले. त्यांची शैली लोकांना आवडते.
लोकसभा निवडणुकीत अखिलेश यांचा ‘पीडीए’चा फॉर्म्युला कामी आल्याचे बोलले जात होते. त्यामुळे ही लढतही अखिलेश यांच्या या फॉर्म्युल्यावर होती. भाजपच्या ‘ओबीसी फर्स्ट’ फॉर्म्युल्यावर ते तुटून पडताना दिसत होते. पोटनिवडणुकीत ‘पीडीए’चा फॉर्म्युला यशस्वी झाला असता, तर 2027 पर्यंत तोच पुढे नेला असता; पण आता भाजप आपला ‘ओबीसी फर्स्ट’ फॉर्म्युला पुढे नेणार आहे. या विधानसभा पोटनिवडणुकीत नऊ जागांवर 90 उमेदवारांमध्ये स्पर्धा होती. सर्व नऊ जागांवर भाजप-सप आणि बसप यांच्यात तिरंगी लढत झाली; मात्र थेट लढत भाजप आणि सपमध्येच राहिली. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत या नऊ जागांपैकी समाजवादी पक्षाकडे चार जागा होत्या तर ‘एनडीए’कडे पाच जागा होत्या. त्यात भाजपकडे तीन तर मित्रपक्षांना दोन जागा होत्या. या पोटनिवडणुकांमध्ये अखिलेश यांनी मुस्लिम कार्ड खेळले तर भाजपने ओबीसींवर डाव लावला. भाजपने सर्वाधिक पाच ओबीसी, एक दलित आणि तीन सवर्ण दिले. भाजपने कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला तिकीट दिले नव्हते, तर समाजवादी पक्षाने सर्वाधिक चार मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय तीन ओबीसी उमेदवार, दोन दलित उमेदवार दिले; परंतु एकाही सवर्णाला तिकीट दिले नाही. यामुळे समाजवादी पक्ष मुस्लिमसमर्थक असल्याचा संदेश गेला. ओबीसी जातींच्या जनगणनेबाबत जिथे विरोधक भाजपला कोंडीत पकडत आहेत, तिथे भाजपने ओबीसींच्या मुद्यावरच बाजी मारली.
उत्तर प्रदेशमधील लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये विशेषत: काँग्रेस आणि समाजवादी पक्षांमध्ये ज्या प्रकारची एकजूट दिसली, ती या वेळी नव्हती. पोटनिवडणूक आपण एकट्याच्याच जीवावर जिंकू, असा विश्वास अखिलेश यांना होता. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला अधिक संधी दिल्यास एक दिवस तो पक्ष आपल्याला खाऊन टाकेल, असे अखिलेश यांना वाटत असावे. उद्याची चिंता करून अखिलेश यांनी वर्तमानही खराब केले. लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि अमेठी आणि इतर लोकसभा जागांवर काँग्रेसला मिळालेली बंपर मते ही केवळ समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यामुळे मिळाली नसल्याचा पुरावा आहे. काँग्रेसनेही या लढाईत रहावे अशी जनतेची इच्छा होती. उत्तर प्रदेशमध्ये अनेकजण काँग्रेसकडे भाजपला पर्याय म्हणून पाहतात. समाजवादी पक्षाने काँग्रेसला बरोबर घेतले असते, तर वेगळे चित्र दिसले असते. भारतीय जनता पक्षाने ‘आरएलडी’ला सोबत घेऊन मोठ्या भावाची भूमिका निभावली; पण अखिलेश यांनी मनाचा असा मोठेपणा दाखवला नाही. कुंडरकीच्या जागेवर तर भाजपने आपला 31 वर्ष जुना विक्रम मोडला. भाजपने ही जागा 1993 मध्ये जिंकली होती. खरे तर मुरादाबाद जिल्ह्यात येणाऱ्या या जागेवर 60 टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत. या जागेवर भाजपचे उमेदवार रामवीर सिंह ठाकूर आणि समाजवादी पक्षाचे उमेदवार हाजी रिझवान यांच्यात चुरशीची लढत व्हायला हवी होती; मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने मोठ्या फरकाने ही जागा गमावली. ही जागा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानली जात होती.
भाजप सरकारमध्ये आठ वर्षांपासून सक्रिय कार्यकर्ता असलेले आणि जनतेला सर्वतोपरी मदत करणारे भाजपचे रामवीर सिंह ठाकूर यांना मुस्लिम समाजातील लोकांचा पाठिंबा मिळाला. त्यांचे कुटुंब मुस्लिमांमध्ये खूप लोकप्रिय होते. यापूर्वी मुस्लिम समाजातील नेत्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली; परंतु त्यांना या समाजाने नाकारले. या मतदारसंघात मुस्लिम मतांची विभागणी झाली. एकूण 12 उमेदवार होते. रामवीर सिंह वगळता सर्व मुस्लिम होते; परंतु मुस्लिम जनतेने त्यांच्यापैकी कोणालाच नेता म्हणून स्वीकारले नाही. या मतदारसंघामध्ये मुस्लिम जनताच अल्लाची शपथ घेऊन भाजपला मत देण्याचे वचन घेत होती. तुर्किक मुस्लिम विरुद्ध राजपूत मुस्लिम मतांचा उपयोग करण्यासाठी भाजपने त्यांच्या उमेदवारीचा डाव खेळला होता. येथिल बासित अली हा नेता मुस्लिम राजपूत आहे. त्याने ठाकूर रामवीर सिंह यांना आपला भाऊ संबोधून मुस्लिम मते मिळवली. कुंडरकीमध्ये सुमारे 40 हजार तुर्किक मुस्लिम तर सुमारे एक लाख 10 हजार इतर मुस्लिम जाती आहेत. मुरादाबादमध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर मोठ्या मशिदीच्या इमामने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. कारण मृताचे कुटुंब भाजपसमर्थक होते. एवढेच नाही तर, आजूबाजूच्या लोकांनीही या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला होता. मृताच्या मुलाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तक्रार दिली होती. मृताच्या मुलाच्या तक्रारीवरून इमामसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात समाजवादी पक्षाच्या नेत्यांवर या कुटुंबाला धमकावल्याचा आरोपही करण्यात आला होता. याचा उलट परिणाम झाला आणि समाजवादी पक्षाच्या विरोधात अनेक लोकांचा मोर्चा निघाला. समाजवादी पक्षाने कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधला, तरी कुंडरकी जागा जिंकू, अशी घोषणा केली होती. रामवीर सिंह यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याचा फायदा भाजपला झाला. अशा प्रकारे भाजपने ताज्या पोटनिवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये केवळ लक्षवेधी जागाच जिंकल्या नाहीत, तर गमावलेली प्रतिष्ठाही कमावली आहे.
(अद्वैत फीचर्स)