अशोक गायकवाड
नवी मुंबई : सर्व शासकिय / निमशासकिय कार्यालयांप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिकेतील महिला कर्मचा-यांना कामाच्या ठिकाणी संतोषजनक व सुरक्षित वातावरण उपलब्ध्‍ करुन देण्याच्या दृष्टीने विशाखा समिती सक्षमतेने कार्यरत असणार आहे, अशी माहिती नवी मुंबईचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सन २००६ पासून विशाखा समिती कार्यरत आहे. १९९४ मध्ये महिला तक्रार समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर सन २०२३ मध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने १९९७ मध्ये जारी केलेल्या (विशाखा निकाल) कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधावरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी तिला विशाखा समिती असे नाव दिले. या अनुषंगाने विशाखा समितीच्या कार्यपद्धतीविषयी व सदस्य म्हणून असणारे कर्तव्य याबाबत माहिती देण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेतील नवनियुक्त विशाखा समिती सदस्यांसाठी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष माहितीसत्र आयोजित करण्यात आले होते.
या माहिती सत्रामध्ये विशाखा समितीच्या अशासकीय सदस्य ॲड. हेमांगी पाटील यांनी विशाखा समितीची स्थापना, कार्यपद्धती, कायदेशीर बाबी अशा अनेक मुद्द्यांबाबत विस्तृत माहिती सदस्यांना दिली. यावेळी नवी मुंबई महानगरपालिका मध्यवर्ती विशाखा समिती तसेच महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत विशाखा समिती आणि आरोग्य विभाग अंतर्गत विशाखा समिती अशा तिन्ही समितीच्या सदस्यांना या माहिती सत्रातून विशाखा समितीच्या कामकाजाविषयी अवगत करण्यात आले. या सत्रास सर्व सदस्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून आपल्या वेगवेगळ्या शंका मांडत समितीच्या कामकाजाची पद्धत बारकाईने समजून घेतली. यावेळी नमुंमपा विशाखा समितीच्या अध्यक्ष तथा उपआयुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे यांनी यापुढील काळात महानगरपालिकेतील विशाखा समिती कशाप्रकारे काम करणार आहे या विषयीचे नियोजन सांगितले. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या विविध विभागातील महिला कर्मचारी यांना विशाखा समितीबाबत माहिती देऊन जागरूकता निर्माण करण्यात येईल अशी माहिती श्रीम. अभिलाषा म्हात्रे यांनी दिली. याकरिता नजिकच्या काळात परिमंडळ एक व परिमंडळ दोन अशाप्रकारे महिला कर्मचाऱ्यांकरिता लैंगिक छळ प्रतिबंध व उपाय यादृष्टीने विशाखा समितीची कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यांकरिताही विशेष सत्र आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *