मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. प्रथेनुसार प्रस्ताव आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल, अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. दुसरीकडे, पद मिळणार असेल तरच प्रस्ताव देण्यात अर्थ असल्याचे उत्तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. मात्र, विरोधी बाकांवरील कोणत्याच पक्षाकडे या नेतेपदासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने महाविकास आघाडीतच जुंपण्याची अधिक शक्यता आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी सभागृहाच्या संख्याबळाच्या दहा टक्के आमदार निवडून येणे आवश्यक आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या 288 संख्येच्या सभागृहात किमान 28 आमदार असतील तर विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा होतो. मात्र ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटातील कोणत्याच पक्षाला हा आकडा गाठता आला नाही. शिवाय निवडणूकपूर्व अथवा निवडणुकीनंतर युतीचे संख्याबळही ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे विधानसभेत यंदा विरोधी पक्षनेता असणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वाधिक संख्या असणार्या विरोधी पक्षाकडे नेतेपद देण्याची प्रथा आहे. तसे झाल्यास 20 आमदारांचा ठाकरे गट या पदावर दावा करू शकतो. त्या पाठोपाठ काँग्रेस 16 आणि शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत.